पुणेकरांनो सावधान! आवडीने हॉटेलमध्ये जेवताय? FDA ची धडक कारवाई; 12 हॉटेल्सचे परवाने निलंबित, 5 जणांना अटक

पुणे : विकेंड असो किंवा कामाच्या धावपळीत स्वयंपाकाचा कंटाळा आला की अनेक पुणेकर हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमध्ये जेवणाचा पर्याय निवडतात. मात्र, बाहेरचे अन्न खाताना आता अधिक सावध राहण्याची गरज आहे.
अन्न व औषध प्रशासनाने (FDA) पुणे विभागात राबवलेल्या ‘सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र’ या विशेष मोहिमेदरम्यान अनेक धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या 12 नामांकित हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि बेकरींवर मोठी कारवाई करण्यात आली असून त्यांच्या परवान्यांचे तात्काळ निलंबन करण्यात आले आहे.

छापेमारीदरम्यान अनेक ठिकाणी अत्यंत अस्वच्छ किचन, मुदतबाह्य अन्नपदार्थांचा साठा, अन्न तयार करताना स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन आणि अन्न सुरक्षा व मानके कायद्याचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले. अनेक आस्थापनांमध्ये ग्राहकांच्या आरोग्याची कोणतीही काळजी घेतली जात नसल्याचेही तपासात स्पष्ट झाले. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने कठोर कारवाईचा बडगा उगारला.


कारवाई झालेल्या आस्थापनांमध्ये पुण्यातील बालेवाडी, कल्याणीनगर, मार्केट यार्ड, बावधन, औंध, पिंपरी-चिंचवड, कामशेत, जुन्नर आणि खेड या भागांतील हॉटेल्स व बेकरींचा समावेश आहे. याशिवाय सातारा जिल्ह्यातील वडूज येथील काही आस्थापनांवरही कारवाई करण्यात आली. ही ठिकाणे नागरिकांमध्ये लोकप्रिय आणि मोठ्या प्रमाणावर गर्दी असलेली असल्याने या कारवाईने अनेकांना धक्का बसला आहे.
या विशेष मोहिमेदरम्यान चिंचवड, पंढरपूर आणि सातारा जिल्ह्यातील वडूज येथे तीन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकण्यात आले. या कारवाईत 3 लाख 48 हजार 78 रुपयांचा प्रतिबंधित, निकृष्ट व बेकायदेशीर अन्नसाठा जप्त करण्यात आला. या अन्नपदार्थांचा वापर ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या पदार्थांमध्ये केला जात असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
केवळ परवाने निलंबित करून प्रशासन थांबलेले नाही. संबंधित आस्थापनांच्या मालकांविरोधात गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले असून 5 जणांना अटक करण्यात आली आहे. अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांविरोधात पुढील काळातही अशीच कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे.
दरम्यान, नागरिकांनी बाहेर जेवताना स्वच्छता, अन्नाची गुणवत्ता आणि संबंधित हॉटेल किंवा रेस्टॉरंटची विश्वासार्हता तपासूनच अन्नपदार्थांचे सेवन करावे, तसेच संशयास्पद प्रकार आढळल्यास अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.