पुणेकरांनो लक्ष द्या! पुणे रेल्वे स्थानकावर 9 तासांचा मेगाब्लॉक; अनेक गाड्या रद्द, कधी आणि का? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

पुणे : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रविवारी (14 जून) पुणे रेल्वे स्थानकावर तब्बल 9 तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार असल्याने रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम होणार आहे. या ब्लॉकमुळे अनेक लोकल, डेमू आणि एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या असून काही गाड्यांच्या मार्गात आणि थांब्यांमध्येही बदल करण्यात आले आहेत.

रेल्वे प्रशासनाकडून पुणे-दौंड रेल्वे विभागात विविध तांत्रिक कामे हाती घेण्यात येणार आहेत. त्यासाठी सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक लागू राहणार आहे. या कालावधीत पुणे स्थानकावरील फलाट क्रमांक 3 आणि 4 वर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडून येणाऱ्या गाड्यांची वाहतूक बंद राहणार आहे.
या मेगा ब्लॉकदरम्यान इलेक्ट्रिक, सिग्नल, दूरसंचार आणि ओव्हरहेड इक्विपमेंटशी संबंधित महत्त्वाची कामे केली जाणार आहेत. त्यामुळे नियमित रेल्वे वेळापत्रकावर परिणाम होणार असून प्रवाशांनी आधीच प्रवासाचे नियोजन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

‘या’ गाड्या राहणार रद्द
99902 पुणे-तळेगाव लोकल

99903 तळेगाव-पुणे लोकल
71406 बारामती-पुणे डेमू
71407 पुणे-दौंड डेमू
79420 सातारा-पुणे डेमू
12135/12136 पुणे-नागपूर-पुणे एक्सप्रेस
11007/11008 मुंबई-पुणे-मुंबई डेक्कन एक्सप्रेस
काही गाड्यांच्या थांब्यांमध्ये बदल
12940 जयपूर-पुणे एक्सप्रेस – खडकी येथे थांबा
12127 सीएसएमटी-पुणे एक्सप्रेस – खडकी येथे थांबा
11078 झेलम एक्सप्रेस – हडपसर येथे प्रवास समाप्त
11406 अमरावती-पुणे एक्सप्रेस – हडपसर येथे प्रवास समाप्त
‘या’ गाड्यांबाबत दिलासा
12939 पुणे-जयपूर एक्सप्रेस
12128 पुणे-मुंबई एक्सप्रेस
या गाड्या नियमित वेळापत्रकानुसार धावणार आहेत. तसेच 11425 पुणे-कोल्हापूर एक्सप्रेस ही गाडी पुण्याऐवजी सातारा स्थानकावरून सुटणार आहे.
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना सुधारित वेळापत्रक तपासूनच प्रवास करण्याचे आवाहन केले आहे. रविवारी रेल्वेने प्रवासाचा बेत असल्यास घराबाहेर पडण्यापूर्वी गाडीची माहिती निश्चित करून घेणे आवश्यक ठरणार आहे.