प्रवाशांनो लक्ष द्या! रविवारी पुण्यात ९ तासांचा मेगाब्लॉक; अनेक ट्रेन रद्द, काहींचे मार्ग बदलले

पुणे : पुणे रेल्वे विभागाकडून पुणे यार्डातील ट्रॅक आणि सिग्नल यंत्रणेच्या आधुनिकीकरणासाठी रविवारी, २३ ऑगस्ट रोजी विशेष पायाभूत सुविधा ब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत तब्बल ९ तास हा मेगाब्लॉक असणार आहे. त्यामुळे रविवारी रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागू शकतो.
या मेगाब्लॉकमुळे काही रेल्वे गाड्या पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही गाड्यांच्या अंतिम स्थानकात बदल करण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करताना रेल्वेचे सुधारित वेळापत्रक तपासणे महत्त्वाचे ठरणार आहे.

‘या’ गाड्या राहणार रद्द
२३ ऑगस्ट रोजी काही गाड्यांच्या फेऱ्या पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये—


मुंबई-पुणे-मुंबई डेक्कन एक्स्प्रेस
दौंड-पुणे डेमू
सातारा-पुणे डेमू
पुण्याऐवजी खडकीपर्यंत धावणार
जयपूर-पुणे एक्स्प्रेस आणि मुंबई-पुणे प्रगती एक्स्प्रेस या गाड्यांना पुणे स्थानकाऐवजी खडकी येथेच थांबा देण्यात येणार आहे. या गाड्या खडकी येथूनच पुढील प्रवासासाठी रवाना होतील.
‘या’ गाड्यांचे हडपसरपर्यंत संचालन
नागपूर एक्स्प्रेस, जम्मू तावी एक्स्प्रेस आणि अमरावती एक्स्प्रेस या गाड्या पुणे स्थानकाऐवजी हडपसरपर्यंतच धावणार आहेत. त्यानंतर या गाड्या हडपसर स्थानकावरून पुढील प्रवासासाठी रवाना होतील.
इतर गाड्यांमध्येही बदल
पुणे-कोल्हापूर गाडी पुण्याऐवजी सातारा स्थानकातून रवाना करण्यात येणार आहे. तसेच बारामती डेमू दौंड स्थानकावरच थांबवण्यात येणार आहे.
लोकल सेवेवरही परिणाम
मेगाब्लॉकचा परिणाम लोकल सेवांवरही होणार आहे. लोणावळा-तळेगाव लोकल गाड्या शिवाजीनगर स्थानकापर्यंतच चालवल्या जातील. तसेच लोणावळ्याकडे जाणारी लोकल सेवा शिवाजीनगर स्थानकातूनच सुरू करण्यात येणार आहे.
त्यामुळे रविवारी रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी घराबाहेर पडण्यापूर्वी आपल्या गाडीचे सुधारित वेळापत्रक आणि सेवा स्थिती तपासावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.