थेऊरमध्ये ६ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न; आरोपीला तात्काळ अटक..

लोणी काळभोर : सुट्टी असल्याने आईसह आजोळी आलेल्या ६ वर्षांच्या चिमुकलीस बॅड टच करून तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एकास तात्काळ अटक करण्यात आली आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार सदर प्रकार मंगळवार (५ मे) रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारांस घडला आहे. याप्रकरणी पिडीत अल्पवयीन मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून श्रीधर लिंबाजी कांबळे (वय ४६, रा. भीमनगर, थेऊर) याला अटक करण्यात आली आहे.
पुणे येथे रहात असलेली पीडित चिमुकली उन्हाळ्याच्या सुट्टीत आईसह आपल्या आजीकडे थेऊर येथे आली होती. ती मंगळवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारांस आपल्या तीन मैत्रीणींसमवेत बसली होती. यावेळी श्रीधर कांबळे तेथे आला व चिमुकली शेजारी बसून तिला बॅड टच करून तिचा विनयभंग केला. यामुळे मुलीने आरडाओरड केली. मुलगी ओरडते आहे हे लक्षात येताच तेथे लोक जमले व तिची सुटका केली.

घडलेला प्रकार तिने आईला सांगितले नंतर तिच्या आईने तत्काळ लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनीही कोणतीही दिरंगाई न करता आरोपीविरुद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून त्याला ताब्यात घेतले. न्यायालयात हजर केल्यानंतर आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

नुकत्याच नसरापूर येथील अत्याचारानंतर झालेली हत्या प्रकरण व पर्वती येथील प्रकरण ताजे असतानाच पुन्हा घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. “नराधमांना कायद्याचा धाक उरला नाही का?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. या घटनांमुळे मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, अशा विकृत प्रवृत्तीवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.