बॅरीकेट्स लावून रोहित पवारांचे आंदोलन गुंडळण्याचा प्रयत्न? पंढरपूरमध्ये संघर्ष सुरू, हजारो शेतकरी एकत्र..

पंढरपूर : शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी सध्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पंढरपूरमध्ये आंदोलन सुरू केले आहे. यावेळी पवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. विठुरायाची पंढरी सर्व भक्तांसाठी कायम खुली असतानाही सरकार बॅरीकेट्स लावून आमच्या मार्गात असे अडथळे आणण्याचा प्रयत्न करतंय.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाने प्रत्येकाला आंदोलनाचा अधिकार दिलाय. त्यामुळं अन्नदात्यासाठीच्या अन्नत्याग आंदोलनात कितीही अडथळे आणले तरी आंदोलन थांबणार नाही. सत्तेचा अहंकार जनतेच्या ताकदीसमोर कधीही टिकत नसतो, हे सरकारने लक्षात ठेवावं.
उलट लढणाऱ्याचे हात धरुन आणि बोलणाऱ्याचं तोंड दाबून सरकार स्वतःचाच पराभव सिद्ध करतंय. पण एक मात्र खरंय, की सरकारच्या दबावामुळं जिल्हा आणि स्थानिक प्रशासनाकडून आमच्या मार्गात अडथळे आणले जात असले तरी मनाने मात्र प्रशासनातील सर्वजण आमच्यासोबत आहे, हे सरकारने विसरु नये,

छत्रपती शिवाजी महाराज आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं स्मारक असलेल्या परिसरातच पंढरपुरात शेतकरी कर्जमाफीसाठी आम्हाला ‘अन्नत्याग’ आंदोलन करायचं आहे आणि ते होणारच आहे. ही बाब या परिसरातील स्टॉलधारकांना समजल्याने आणि आमच्या शहराध्यक्षांनीही त्यांना विनंती केली.

या सर्व स्टॉलधारकांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी होणाऱ्या या प्रामाणिक आंदोलनाला पाठींबा देत तातडीने जागा उपलब्ध करुन दिली. ही आहे माणुसकी, महाराष्ट्र धर्म आणि शेतकऱ्यांविषयीचं प्रेम. पण जी गोष्ट सामान्य जनतेला कळते ती सरकारला कळत नाही, हे दुर्दैव आहे.
आता सरकारने एकतर आंदोलनाला परवानगी द्यावी किंवा परवानगी द्यायची नसेल तर कर्जमाफीच्या अटीशर्ती काढून टाकाव्यात. अन्यथा कितीही अडथळे आणले तरी आंदोलन थांबणार नाही. ते होणारच, असा इशारा रोहित पवार यांनी दिला आहे.