व्हॉट्सॲप ग्रुपवरील चर्चेनंतर खळबळ; तहसीलदारासह ग्रुप ॲडमिनवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा, पोलिस तपास सुरू

बारामती : बारामती तालुक्यातील जळगाव सुपे येथील एका व्हॉट्सॲप ग्रुपवर झालेल्या चर्चेचे पडसाद आता थेट पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचले आहेत. अनुसूचित जातीच्या व्यक्तीबाबत कथित जातीय आणि आक्षेपार्ह टिप्पणी केल्याच्या आरोपावरून बीड जिल्ह्यातील गेवराईचे तहसीलदार संदीप केशव खोमणे आणि ग्रुप ॲडमिन सुनील दत्तू खोमणे यांच्याविरोधात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे प्रशासकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

माहितीनुसार, जळगाव सुपे येथील “आपला गाव, आपला विकास” या व्हॉट्सॲप ग्रुपवर ग्रामपंचायतीच्या आरक्षणासंदर्भात चर्चा सुरू होती. या चर्चेदरम्यान ग्रुपमधील सदस्य संदीप रमेश खंडाळे यांनी सरपंचपदाच्या आरक्षणाबाबतचे निवेदन पोस्ट केले होते. त्यानंतर विविध सदस्यांमध्ये मतांची देवाणघेवाण सुरू असताना काही प्रतिक्रिया आणि टिप्पण्या वादग्रस्त ठरल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तक्रारदार संदीप खंडाळे यांनी पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीत, चर्चेदरम्यान जातीय भावना दुखावतील अशा स्वरूपाचे वक्तव्य करण्यात आल्याचा दावा केला आहे. तसेच वाद वाढल्यानंतर त्यांना व्हॉट्सॲप ग्रुपमधून काढून टाकण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. या प्रकरणात ग्रुप ॲडमिनची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

फिर्यादीनंतर माळेगाव पोलिसांनी प्राथमिक चौकशी करून तहसीलदार संदीप खोमणे आणि ग्रुप ॲडमिन सुनील खोमणे यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला. भारतीय न्याय संहितेतील कलम 3(5) तसेच अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियमातील कलम 3(1)(r), 3(1)(s), 3(1)(u) आणि 3(1)(za)(E) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, संबंधित व्हॉट्सॲप ग्रुपमधील संदेश, डिजिटल पुरावे, सदस्यांचे जबाब आणि इतर तांत्रिक बाबींची तपासणी केली जात आहे. पोलिसांकडून ग्रुपमधील चर्चेचा संपूर्ण डेटा आणि त्यातील संदेशांची सत्यता पडताळून पाहिली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, एका कार्यरत तहसीलदाराविरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाल्याने प्रशासकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे. या प्रकरणात नेमके काय घडले, संबंधित संदेशांचा संदर्भ काय होता आणि आरोपांमध्ये कितपत तथ्य आहे, याबाबत तपासानंतरच स्पष्ट चित्र समोर येणार आहे.
दुसरीकडे, या आरोपांबाबत तहसीलदार संदीप खोमणे यांची बाजू जाणून घेण्यासाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे या प्रकरणावर त्यांची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही.
सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून, पोलिसांच्या निष्कर्षानंतर पुढील कायदेशीर कारवाईचा मार्ग निश्चित होणार आहे.