कलिंगड खाल्लं आणि 4 जणांचा मृत्यू… अपघात समजत होता, पण आतून बाहेर आलं धक्कादायक रहस्य! मेकअप आर्टिस्ट-बिल्डर कनेक्शन उघड


मुंबई : मुंबईतील पायधूनी परिसरात कलिंगड खाल्ल्यानंतर एका कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना सुरुवातीला अन्नबाधा म्हणून समोर आली होती. मात्र तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळत असून आता यामागे घातपाताचा संशय अधिक बळावत आहे. या प्रकरणात मृतांपैकी अब्दुल्ला डोकाडिया यांचे नाव समोर आले असून ते एका वेगळ्याच गंभीर गुन्ह्यातील महत्त्वाचे साक्षीदार असल्याची माहिती उघड झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हमीदा शेख या मेकअप आर्टिस्ट महिलेने काही महिन्यांपूर्वी बिल्डर आफताब विरोधात फसवणूक आणि अत्याचाराचे गंभीर आरोप करत पोलिसांत तक्रार दाखल केली होती. फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाल्यानंतर दोघांमध्ये जवळीक वाढली आणि २०२० साली त्यांनी लग्न केले. मात्र लग्नाआधीच आफताबने हमीदाकडे व्यवसायासाठी ५० लाख रुपयांची मागणी केली होती. त्यापैकी २५ लाख रुपये देताना अब्दुल्ला डोकाडिया हे प्रत्यक्ष व्यवहारात सहभागी होते, ज्यामुळे ते या प्रकरणातील एकमेव साक्षीदार ठरले.

लग्नानंतर काही काळ सर्व काही सुरळीत सुरू असले तरी नंतर या नात्यात तणाव वाढला. हमीदाने आफताबवर केवळ आर्थिक फसवणुकीचे नव्हे, तर अनैसर्गिक अत्याचार आणि मानसिक छळाचेही गंभीर आरोप केले. या त्रासाला कंटाळून २०२३ मध्ये तिने पोलिसांत गुन्हा दाखल केला. या प्रकरणात आफताबवर विविध गंभीर कलमांखाली गुन्हा नोंद असून तपास सुरू होता.

अशातच, या प्रकरणातील प्रमुख साक्षीदार असलेले अब्दुल्ला डोकाडिया आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. कलिंगड खाल्ल्यानंतर झालेला मृत्यू हा केवळ योगायोग आहे की त्यामागे नियोजित कट आहे, याबाबत आता संशय व्यक्त केला जात आहे.

पोलीस सध्या या दोन्ही प्रकरणांचा संबंध तपासत असून, मृत्यूमागील खरी कारणे शोधण्यासाठी विविध कोनातून चौकशी सुरू आहे. या घटनेमुळे मुंबईत पुन्हा एकदा सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, पुढील तपासात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!