लेकीच्या हातावर अक्षता पडत होत्या… अन् बापाची प्राणज्योत मालवली; कन्यादान करतानाच वडिलांचा हृदयविकाराने मृत्यू


बुलढाणा : घरात लग्नाची लगबग सुरू होती. सनई-चौघड्यांचे सूर घुमत होते. लाडक्या लेकीच्या डोळ्यांत नव्या संसाराची स्वप्नं होती आणि वडिलांच्या चेहऱ्यावर तिचं लग्न स्वतःच्या हाताने लावून देण्याचं समाधान… पण नियतीने काही क्षणांतच आनंदाच्या त्या मंडपावर दु:खाची काळी छाया टाकली. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील वरदडी येथे कन्यादान सुरू असतानाच वधूपित्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसर हळहळला आहे.

कुरुमदास कुंडलिक भुतेकर (५०) असे मृत वडिलांचे नाव असून, त्यांची मुलगी नंदिनी हिचा विवाह जालना जिल्ह्यातील मंठा येथील प्रदीप नानोटे यांच्यासोबत ठरला होता. गुरुवारी सायंकाळी मोठ्या उत्साहात विवाह सोहळा सुरू होता. नातेवाईक, मित्रपरिवार आणि गावकरी यांच्या उपस्थितीत मंगलाष्टकांचे सूर सुरू होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. मंगलाष्टक संपल्यानंतर लग्नातील सर्वात भावनिक क्षण असलेला कन्यादान विधी सुरू झाला.

आपल्या लेकीचा हात जावयाच्या हातात देताना कुरुमदास भुतेकर भावूक झाले होते. मात्र, काही क्षणांतच त्यांच्या छातीत अचानक तीव्र वेदना सुरू झाल्या आणि ते मंडपातच कोसळले. सुरुवातीला उपस्थितांना थकवा किंवा चक्कर आल्याचे वाटले. कुटुंबीयांनी तातडीने त्यांना जवळच्या रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. काही मिनिटांपूर्वी आनंदाने भरलेला मंडप क्षणार्धात शांत झाला. लेकीच्या डोळ्यांतील आनंद अश्रूंमध्ये बदलला आणि लग्नाच्या अक्षतांचे रूपांतर हंबरड्यात झाले.

कुरुमदास भुतेकर यांची प्रकृती गेल्या काही महिन्यांपासून नाजूक होती. डिसेंबर महिन्यात त्यांच्यावर मोठी बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली होती. डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला होता. मात्र, “मुलीचं लग्न माझ्या हातानेच व्हायला हवं,” ही त्यांची शेवटची इच्छा होती. प्रकृतीची पर्वा न करता त्यांनी लग्नाची सर्व तयारी स्वतः केली होती. लेकीला आनंदाने सासरी पाठवण्याचं स्वप्न त्यांनी पूर्ण केलं, पण त्याच क्षणी काळाने त्यांच्यावर घाला घातला.

या घटनेची बातमी गावभर पसरताच वरदडी परिसरात शोककळा पसरली. ज्या घरातून लेकीची पाठवणी होणार होती, त्याच घरातून काही तासांत वडिलांची अंत्ययात्रा निघाल्याने गावकऱ्यांचे डोळे पाणावले. आनंदाच्या क्षणात घडलेल्या या दुर्दैवी घटनेने संपूर्ण सिंदखेड राजा तालुका सुन्न झाला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!