ऐतिहासिक विजयदुर्ग किल्यावर ‘आरमार म्युझियम’ साकारणार , राज्य शासनाकडून निधी मंजूर ..!!

देवगड : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आरमाराची ओळख आणि पर्यायाने यातून होणारी संभाव्य पर्यटन वृध्दी यासाठी सिंधुरत्न समितीच्या माध्यमातून ऐतिहासिक विजयदुर्ग येथे ‘आरमारी म्युझियम’ साकारणार आहे. या प्रकल्पासाठी शासनाची सुमारे दोन एकर जागा उपलब्ध झाली आहे. सुमारे साडेचार कोटींच्या प्राथमिक निधीला प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. लवकरच निविदा प्रक्रिया होईल, अशी माहिती माजी आमदार प्रमोद जठार यांनी जामसंडे येथे दिली.
माजी आमदार प्रमोद जठार म्हणाले, ‘राजा भोज याने किल्ले विजयदुर्ग बांधला आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी तो विस्तारला. विजयदुर्ग येथे छत्रपती शिवरायांची आरमारी गोदी होती. त्यामुळे ऐतिहासिक विजयदुर्गला ‘आरमारी म्युझियम’ करण्याचे ‘सिंधुरत्न समिती’च्या माध्यमातून प्रस्तावित केले होते.
आपल्यासह समितीचे अध्यक्ष शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचा पाठपुरावा तसेच आमदार नितेश राणे यांचे सहकार्य यातून याला मंजुरी मिळाली. विजयदुर्गला बांधकाम विभागाची सुमारे दोन एकर जाग्यासाठी उपलब्ध झाली असून, सुमारे साडेचार कोटींच्या निधीला प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. आवश्यक वाटल्यास मंत्री गिरीश महाजन यांनी आणखी निधी देण्याचे मान्य केले आहे.
म्युझियम परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबरोबरच कान्होजी आंग्रे, मायनाक भंडारी आदींचे पुतळे, जहाजांच्या प्रतिकृती तसेच अन्य माहिती देणाऱ्या बाबी साकारण्यात येतील. यासाठी रघुजी आंग्रे आणि जे. जे. आर्ट स्कूलमधील अभ्यासक कामाला लागले आहेत.’’
‘‘विजयदुर्ग हेलियमचे पाळणाघर असल्याने लेझर शो, ब्रह्मांडाची माहिती तसेच या आरमार म्युझियममुळे पर्यटकांसाठी पर्वणी ठरेल. यातून स्थानिक पर्यटन वाढून आर्थिक उलाढाल होण्यास मदत होईल.”
इतिहासप्रेमींना आवाहन
शिवरायांच्या आरमारी केंद्राची ओळख म्हणून विजयदुर्गला ‘आरमारी म्युझियम’ होत आहे. त्यामुळे ऐतिहासिक काळातील दस्तऐवज किंवा काही साहित्य कोणाकडे असल्यास सिंधुरत्न समितीशी संपर्क साधावा. त्यामुळे म्युझियममध्ये त्याची मांडणी करण्यास हातभार लागू शकेल. इतिहासप्रेमींनी संपर्क साधण्याचे आवाहन प्रमोद जठार यांनी केले आहे.
पर्यटकसंख्येत वाढ
अलीकडेच मालवण येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी येऊन गेल्यानंतर सिंधुदुर्ग किल्ला आणि राजकोट येथील पर्यटकांची संख्या वाढली आहे. आरमारी म्युझियममुळे गोवा, मालवणकडे येणारा पर्यटक विजयदुर्गला येईल. यातून स्थानिक उलाढाल होण्यास मदत होईल, असे जठार म्हणाले.