आता कागदी नोटा होणार इतिहासजमा? येणार प्लास्टिकच्या 10 आणि 20 रुपयांच्या नवीन नोटा; जाणून घ्या RBI चा मोठा प्लॅन

नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँक देशाच्या चलन व्यवस्थेत महत्त्वाचा बदल करण्याच्या तयारीत आहे. डिजिटल व्यवहारांचा वाढता वापर लक्षात घेता आता 10 आणि 20 रुपयांच्या पॉलीमर (प्लास्टिक) नोटा प्रायोगिक स्वरूपात चलनात आणण्याचा प्रस्ताव पुढे सरकला आहे. केंद्र सरकारने या प्रकल्पाला मंजुरी दिली असून, पहिल्या टप्प्यात मर्यादित प्रमाणात या नोटांची छपाई केली जाणार आहे.
सुरुवातीच्या टप्प्यात एकूण 200 कोटी रुपयांच्या 10 आणि 20 रुपयांच्या पॉलीमर नोटा छापल्या जाणार आहेत. या नोटा प्रायोगिक स्वरूपात बाजारात आणून त्यांचा वापर, टिकाऊपणा आणि परिणामकारकतेचा अभ्यास केला जाणार आहे.

लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, हा प्रयोग यशस्वी ठरल्यास भविष्यात इतर मूल्यांच्या नोटांबाबतही निर्णय घेतला जाऊ शकतो.


पॉलीमर नोटा का आणल्या जात आहेत?
सध्या वापरात असलेल्या कागदी नोटा वारंवार वापर, पाणी, धूळ आणि घाण यामुळे लवकर खराब होतात. त्यामुळे RBIला जुन्या नोटा बदलण्यासाठी आणि नव्या नोटा छापण्यासाठी मोठा खर्च करावा लागतो. त्याउलट पॉलीमर नोटा अधिक टिकाऊ असून त्या सहज फाटत नाहीत. पाणी आणि धुळीचाही त्यांच्यावर कमी परिणाम होतो. शिवाय, अशा नोटांची बनावट प्रत तयार करणे तुलनेने कठीण असल्याने चलनातील फसवणूक रोखण्यासही मदत होऊ शकते.
जुन्या 10 आणि 20 रुपयांच्या नोटांचं काय?
प्लास्टिकच्या नोटा चलनात आल्या तरी सध्याच्या 10 आणि 20 रुपयांच्या कागदी नोटा बंद होणार नाहीत. त्या पूर्वीप्रमाणेच वैध चलन म्हणून वापरता येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
RBIचा हा प्रायोगिक उपक्रम यशस्वी ठरल्यास भविष्यात भारताच्या चलन व्यवस्थेत मोठा बदल होण्याची शक्यता असून, अधिक टिकाऊ आणि सुरक्षित नोटांच्या दिशेने हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.