‘ऑपरेशन टायगर 3.0’ची जोरदार चर्चा! ठाकरेंचे 4 आमदार शिंदेंच्या संपर्कात? 12 जणांचा पाठिंबा असल्याचा दावा


मुंबई : शिवसेना ठाकरे गटातील सहा खासदारांनी शिंदे गटाची वाट धरल्यानंतर राज्याच्या राजकारणात निर्माण झालेली खळबळ अद्याप शांत झालेली नसतानाच आता आणखी एक मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. ठाकरे गटातील चार आमदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गुप्त भेट घेतल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली असून, या आमदारांनी आणखी 12 आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, ही भेट दोन ते तीन दिवसांपूर्वी झाल्याचे सांगितले जात आहे. शिवसेना ठाकरे गटाकडे सध्या सुमारे 20 आमदार असून पक्षातील मोठा गट वेगळा करण्यासाठी आवश्यक संख्याबळ गोळा करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहे. यासाठी संबंधित आमदारांनी आणखी काही काळाची मुदत मागितल्याचीही माहिती समोर येत आहे.

राजकीय सूत्रांच्या दाव्यानुसार, पुढील दोन ते तीन महिन्यांत स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी आवश्यक संख्याबळ उभे करण्याचा प्रयत्न सुरू आहे. जर हा प्रयत्न यशस्वी झाला, तर खासदारांनंतर आमदारांचीही मोठी फूट पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वासमोर नवे आव्हान उभे राहू शकते.

दरम्यान, या कथित भेटीत सहभागी झालेल्या आमदारांची नावे अद्याप गुप्त ठेवण्यात आली आहेत. मात्र, अलीकडेच झालेल्या खासदारांच्या पक्षांतरानंतर आता आमदारांबाबतही अशाच चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटात अस्वस्थता वाढल्याचे बोलले जात आहे.

या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना खासदार नरेश म्हस्के यांनी सूचक विधान केले. “जे काही घडणार आहे ते लवकरच सर्वांसमोर येईल,” असे सांगत त्यांनी ठाकरे गटातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाराज असल्याचा दावा केला. कार्यकर्त्यांची कामे होत नसल्याने अनेक जण शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत असल्याचेही त्यांनी म्हटले.

राज्यातील सत्तासमीकरणांवर परिणाम करणाऱ्या या घडामोडींमुळे ‘ऑपरेशन टायगर 3.0’ची चर्चा पुन्हा एकदा रंगू लागली आहे. येत्या काही आठवड्यांत या राजकीय हालचालींना अधिक वेग मिळणार का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!