केतन अग्रवाल हत्याकांडानंतर आणखी एक धक्कादायक ‘लव्ह मर्डर’! लग्नाला तीन दिवस बाकी असताना होणाऱ्या नवऱ्याची हत्या

झारखंड : पुण्यातील केतन अग्रवाल हत्याकांडाने संपूर्ण राज्य हादरलेले असतानाच आता झारखंडमधूनही तितकेच धक्कादायक ‘लव्ह मर्डर’ समोर आले आहे. प्रेमसंबंधांमध्ये अडथळा ठरत असल्याच्या कारणावरून एका तरुणीने लग्नाला अवघे तीन दिवस शिल्लक असताना होणाऱ्या नवऱ्याची हत्या घडवून आणल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या गुन्ह्यात तिच्या बहिणीच्या पतीलाही अटक करण्यात आली असून दोघांनी मिळून नियोजनबद्ध कट रचल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे.

झारखंडच्या गिरीडीह जिल्ह्यातील भिखोडीह गावात राहणारा २१ वर्षीय नीरज हाजरा याचा विवाह गमतरिया गावातील उर्मिला कुमारी हिच्याशी निश्चित झाला होता. विवाहाची तयारी अंतिम टप्प्यात असतानाच ५ जुलै रोजी नीरज अचानक बेपत्ता झाला. कुटुंबीयांनी शोध घेतल्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. सुरुवातीला बेपत्ता प्रकरण मानून तपास सुरू झाला, मात्र अपहरणाचा संशय व्यक्त होताच पोलिसांनी विशेष तपास पथकाची स्थापना केली.
मोबाईल लोकेशन, कॉल डिटेल रेकॉर्ड आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास करताना नीरजच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन बिहारमधील जमुई जिल्ह्यातील बेला जंगल परिसरात आढळले. याच जंगलात काही दिवसांपूर्वी सापडलेला अज्ञात मृतदेह नीरजचाच असल्याचे निष्पन्न झाले आणि हत्येचे गूढ उलगडू लागले.

पोलिस चौकशीत उर्मिलाचे तिच्या बहिणीचा पती सुभाष पासवान याच्याशी अनेक महिन्यांपासून प्रेमसंबंध असल्याची माहिती समोर आली. घरच्यांनी उर्मिलाचे लग्न नीरजसोबत ठरवल्यानंतर हे नाते तुटण्याची भीती दोघांना होती. त्यामुळे नीरजला मार्गातून हटवण्याचा कट रचण्यात आला. नियोजनपूर्वक त्याची हत्या करून मृतदेह जंगलात फेकण्यात आला. पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न करण्यात आला होता.

मात्र तांत्रिक तपास, मोबाईल डेटा आणि चौकशीत मिळालेल्या पुराव्यांमुळे आरोपींचा डाव उधळला. पोलिसांनी उर्मिला कुमारी आणि सुभाष पासवान या दोघांना अटक केली असून खून आणि पुरावे नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पुढील तपास सुरू आहे.