महाराष्ट्रात आणखी एक पेपर फुटला? 100 पैकी 90 प्रश्न WhatsApp वर व्हायरल; विद्यार्थ्यांचा खळबळजनक दावा


मुंबई : मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशभरात विविध भरती आणि प्रवेश परीक्षांमधील पेपरफुटीच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे. अलीकडेच नीट पेपरफुटीचे प्रकरण चर्चेत आले होते. त्यानंतर या मुद्द्यावरून दिल्लीतील जंतर-मंतर येथे कॉकरोच जनता पार्टीने आंदोलन छेडले. विद्यार्थ्यांच्या वाढत्या रोषामुळे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला.

दरम्यान, आता महाराष्ट्रातही आणखी एका भरती परीक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. राज्यात झालेल्या औषध निरीक्षक भरती परीक्षेचा पेपर फुटल्याचा दावा विद्यार्थ्यांकडून करण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, या परीक्षेतील 100 पैकी तब्बल 90 प्रश्न परीक्षा होण्यापूर्वीच WhatsApp वर व्हायरल झाले होते. यासंदर्भातील काही कथित स्क्रीनशॉटही समोर आले असून, त्यामध्ये संबंधित प्रश्न औषध निरीक्षक भरती परीक्षेचे असल्याचा दावा करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 22 मार्च 2026 रोजी राज्यभर औषध निरीक्षक भरती परीक्षा पार पडली. या परीक्षेला लाखो उमेदवार बसले होते. मात्र, परीक्षेच्या दोन दिवस आधी म्हणजे 20 मार्चलाच प्रश्नपत्रिकेतील प्रश्न WhatsApp ग्रुपवर फिरू लागल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. WhatsApp सोबतच Telegram वरील अनेक ग्रुपमध्येही हे प्रश्न व्हायरल झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

यासंदर्भातील अनेक स्क्रीनशॉट 20 मार्च रोजीच विद्यार्थ्यांच्या विविध ग्रुपमध्ये व्हायरल झाल्याचे सांगितले जात आहे. तसेच प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्यासाठी लाखो रुपयांची मागणी करण्यात आल्याचाही आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. काही कथित चॅट्समध्ये पाच लाख रुपयांची मागणी करण्यात आल्याचेही दिसून येत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

नीट पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर देशभरात आधीच संतापाची लाट असताना, महाराष्ट्रातही आणखी एक पेपरफुटीचा आरोप समोर आल्याने स्पर्धा परीक्षा व्यवस्थेच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!