उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का, पुण्यातील माजी आमदार करणार शिंदे गटात प्रवेश…

पुणे : राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रात पुन्हा एकदा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. येत्या काही महिन्यात महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सध्या सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे.
याच पार्श्वभूमीवर, शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. पुण्याचे माजी आमदार महादेव बाबर यांनी शिवसेनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असून, ते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटात प्रवेश करणार आहेत.
याबाबतच्या चर्चा मुंबईतील शासकीय निवासस्थानी झाल्या, जिथे महादेव बाबर आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झाली. महादेव बाबर यांना विधानसभा निवडणुकीत तिकीट न मिळाल्यामुळे ते नाराज होते.
हडपसर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा असतानाही, त्यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. बाबर यांच्यासोबत काही नगरसेवक देखील शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची शक्यता आहे.
दरम्यान, अभिषेक वर्मा हेही शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत आहेत. अभिषेक वर्मा हे एक भारतीय अब्जाधीश आहेत, आणि त्यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचे कारण विकास आणि हिंदुत्वाचे रक्षण असल्याचे सांगितले आहे.