शिवराज मोटेगावकर यांना आणखी मोठा धक्का; अनधिकृत बांधकामावर प्रशासनाचा हातोडा पडणार?

लातूर : नीट पेपरफुटी प्रकरणात लातूर येथील आरसीसी कोचिंग क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर यांना सीबीआयने अटक केली आहे. या प्रकरणाशी संबंधित त्यांच्या शैक्षणिक संकुलासाठी लातूरच्या खोपेगाव शिवारात उभारलेली इमारत ही बांधकाम परवाना न घेता अनधिकृतपणे बांधल्याचे समोर आले आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने संबंधित अनधिकृत बांधकामावर कारवाईचे आदेश दिले असून मोटेगावकर यांना नोटीस बजावत बांधकाम परवाना व इतर आवश्यक कागदपत्रे सादर करण्यास सांगण्यात आले आहे.
लाखो रुपयांची फी आकारून कोचिंग क्षेत्रात मोठे साम्राज्य उभे केल्याचा आरोप असलेल्या मोटेगावकर यांच्या अटकेनंतर विविध स्तरातून आंदोलन सुरू झाले आहे. तसेच या प्रकरणाचा तपास अधिक वेगाने सुरू असून, काही प्राध्यापक आणि संबंधित व्यक्तींची नावे समोर आली आहेत.

दरम्यान, मोटेगावकर यांच्या क्लासमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या पालकांचीही सीबीआयकडून चौकशी केली जात आहे. NEET प्रश्नपत्रिका आणि उत्तरांशी संबंधित माहिती मिळाल्याच्या संशयावरून ही चौकशी सुरू आहे. तसेच पुण्यातून ११ आरोपींना अटक झाल्याची माहितीही समोर आली आहे.
