अमृता फडणवीस ब्लॅकमेल प्रकरणात अनिक्षा जयसिंघानीला जामीन मंजूर…!

मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना ‘ब्लॅकमेल’ करणारा बुकी अनिल जयसिंघानी आणि त्यांची मुलगी अनिक्षा जयसिंघानीसंदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे. अमृता फडणवीस ब्लॅकमेल प्रकरणात अनिक्षा जयसिंघानीला जमीन मंजूर झालाय. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना १ कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी डिझायनर अनिक्षा जयसिंघानी हिला अटक करण्यात आली होती.
अनिक्षा हिच्यावर अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेलिंग आणि लाच दिल्याचा आरोप असून अमृता फडणवीस यांच्या तक्रारीवरून तिला १६ मार्च रोजी अटक करण्यात आली होती. आता या प्रकरणात जयसिंगानीला मुंबई सत्र न्यायालयाने ५० हजारांचा जामीन मंजूर केला आहे. गेल्या सुनावणीत अनिक्षाला १४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. कोठडी सुनावल्यानंतर लगेच जयसिंघानी यांनी कोर्टात जामीन अर्ज दाखल केला होता.
अमृता फडणवीस यांनी केलेल्या आरोपानुसार, अनिक्षाने अमृता फडणवीस यांना एक कोटी रुपयांची ऑफर दिली होती आणि त्यानंतर त्यांना ब्लॅकमेलही केलं होतं. या प्रकरणातील आरोपी अनिल जयसिंघानी याला २० मार्च रोजी गुजरातमध्ये अटक करण्यात आली. वडील अनिल जयसिंघांनी आणि मुलगी अनिक्षा दोघांनी मिळून अमृता फडणवीसांना फसवण्यासाठी पुरेपूर प्लॅन केला होता. कोणताही मेसेज पाठवण्याआधी ते एकमेकांशी चर्चा करत होते.