तडीपार आरोपीची लोणी काळभोरमध्ये दहशत माजवण्याचा प्रयत्न; हातातील धारदार हत्यारासह पोलिसांनी घेतले ताब्यात..


लोणी काळभोर : पुणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आलेल्या २२ वर्षीय आरोपीने तडीपारीचा आदेश झुगारून लोणी काळभोरमध्ये प्रवेश केला.

हातात धारदार लोखंडी हत्यार घेऊन आरडाओरड व शिवीगाळ करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी (ता. १८) दुपारी सव्वा चारच्या सुमारास अंबरनाथ मंदिरामागील कुस्ती आखाड्याजवळ घडली. लोणी काळभोर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले आहे.

पियुष ऊर्फ युवराज गणेश भिसे (वय २२, रा. पाण्याच्या टाकीजवळ, लोणी काळभोर, ता. हवेली) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार राहुल राजाराम कर्डीले यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भिसे याला यापूर्वी पुणे पोलीस आयुक्तालय, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय तसेच पुणे जिल्ह्याच्या हद्दीबाहेर दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले होते.

तडीपारीचा आदेश लागू असतानाही तो लोणी काळभोर परिसरात आला. शुक्रवारी दुपारी तो हातात धारदार लोखंडी हत्यार घेऊन अंबरनाथ मंदिरामागील कुस्ती आखाड्याजवळ आरडाओरड व शिवीगाळ करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत त्याला ताब्यात घेतले.

पोलिसांनी त्याच्याकडून सुमारे ५०० रुपये किमतीचे धारदार लोखंडी हत्यार जप्त केले आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस अंमलदार सय्यद करीत आहेत.

ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप पवार, पोलिस निरीक्षक (गुन्हे) नंदकुमार कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सतीश गोडसे, पोलिस हवालदार अण्णा माने, निलेश कोल्हे, सुरज कुंभार, सागर जगदाळे, पोलिस अंमलदार सचिन सोनवणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!