पश्चिम महाराष्ट्राला अलर्ट! विजांच्या कडकडाटांसह अवकाळीचा इशारा, पुढील 24 तास अतिमहत्वाचे..

पुणे : सध्या पश्चिम महाराष्ट्रातही हवामानात बदल झाला आहे. आज काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुण्यातील तापमानात चढ-उतार सुरूच आहेत. गेल्या २४ तासांत ३९.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मंगळवारी कमाल तापमान ४० आणि किमान तापमान १९ अंश सेल्सिअस राहील. दुपारपर्यंत निरभ्र असलेले आकाश दुपारनंतर ढगाळ होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाळ हवामानासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. गेल्या २४ तासांत साताऱ्यात कमाल तापमान ३९.६ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. पुढील २४ तासांत कमाल तापमान ३९ अंश आणि किमान तापमान २१ अंश सेल्सिअस राहील.
तसेच कोल्हापूर जिल्ह्यात कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २२ अंश सेल्सिअस राहील. मेघगर्जनेसह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील ४८ तास कोल्हापूर जिल्ह्यात ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यात आज तापमान बदलत असून, आकाश अंशतः ढगाळ राहील आणि गडगडाटी वादळांचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. सांगली जिल्ह्यात विजांसह पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
तसेच सोलापूर जिल्ह्यातील तापमानात वाढ सुरूच असून, कमाल तापमान ४१ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २५ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. पुढील २४ तास सोलापूर जिल्ह्यात मेघगर्जनेसह आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, राज्यातील हवामान सतत बदलत आहे. मंगळवारी काही भागात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर काही भागात उष्ण आणि दमट हवामान राहील. पश्चिम महाराष्ट्रातही हवामानात बदल झाला आहे. आज काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळे पुढील काही दिवस महत्वाचे आहेत.