अजितदादांचे धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर, पत्नी आमदार असताना पतीलाही दिली आमदारकी..

मुंबई : सध्या राज्यात विधान परिषदेच्या पाच जागांसाठी 27 मार्च रोजी निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपने आपल्या तीन उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. यामुळे अजित पवार आणि एकनाथ शिंदे कोणाला संधी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते विधान परिषदेतील 5 सदस्य विधानसभेवर निवडून गेल्याने त्यांच्या रिक्त जागेवर ही निवडणूक होणार आहे.
आता भाजपने 3 उमेदवारांची घोषणा केल्यानंतर आज राष्ट्रवादी अजित पवार गटाने आपला उमेदवार जाहीर केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून संजय खोडके यांना संधी देण्यात आली आहे. यामुळे अजित पवारांनी सर्वानाच धक्का दिला आहे. अनेकजण इच्छुक असताना अजित पवारांनी हा निर्णय घेतल्याने याची चर्चा सुरु आहे.
संजय खोडके हे अजित पवारांचे निकटवर्तीय समजले जातात. संजय खोडके यांच्या पत्नी सुलभा खोडके या अमरावती मतदारसंघाच्या आमदार आहेत. त्यामुळे आता विधीमंडळात पती-पत्नी एकत्र दिसणार आहेत. अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड केल्यानंतर संजय घोडके यांनी त्यांना साथ दिली. यामुळे अजित पवारांनी हा निर्णय घेतला आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राजेश विटकर यांच्या जागी खोडके यांना संधी मिळणार आहे. या जागेसाठी झिशान सिद्दिकी यांच्या नावाची चर्चा सुरू होती. महायुतीमध्ये भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. भाजपकडे विधान परिषद निवडणुकीसाठी अनेकजण इच्छुक होते. भाजपने आपल्या तीन उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे.
भाजपने संदीप जोशी, संजय केणेकर, दादाराव केचे यांना विधान परिषदेवर संधी दिली आहे. शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार यांना प्रत्येकी एक जागा सोडण्यात आली आहे. अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. दरम्यान, विधानपरिषदेचे सदस्य असलेले आमश्या पाडवी, प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर, रमेश कराड आणि राजेश विटेकर हे विधानसभेवर निवडून गेल्याने या जागा रिक्त झाल्या होत्या.
याबाबत विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी येत्या 27 मार्च रोजी सकाळी नऊ ते चार वाजेपर्यंत मतदान होणार आहे. ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे संकेत आहेत. यामुळे इतर पक्ष उमेदवार देणार की ही निवडणूक बिनविरोध होणार हे आजच समजेल. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अनेकांना संधी न मिळाल्याने अनेकजण नाराज असल्याची माहिती आहे.