अजितदादांचा काँग्रेसला देणार मोठा धक्का! दोन बडे नेते करणार राष्ट्रवादीत प्रवेश…

मुंबई : राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर आता काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे, कारण पक्षाचे दोन वरिष्ठ नेते लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
महाविकास आघाडीच्या दारुण पराभवानंतर काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. भाजप खासदार अशोकराव चव्हाण यांचे मेहुणे आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. यासोबतच मीनल खतगावकर देखील राष्ट्रवादीच्या गोटात दाखल होणार असल्याची चर्चा आहे.
दरम्यान, काँग्रेसकडून मीनल खतगावकर यांनी नायगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती, मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर आता खतगावकर कुटुंब राष्ट्रवादीत प्रवेश करण्याच्या तयारीत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रयत्नातून हा पक्षप्रवेश लवकरच अजित पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे. काँग्रेसचे माजी आमदार मोहन हंबर्डे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर आता भास्करराव पाटील खतगावकरही राष्ट्रवादीत सामील होण्याची शक्यता असल्याने नांदेडमध्ये पक्षाची ताकद वाढेल.