अजित पवारांचा मोठा धमाका! ४ बडे नेते राष्ट्रवादीत प्रवेश करणार, नावही आली समोर…

सांगली : राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. अशातच आता . सांगली जिल्ह्यातील चार माजी आमदार अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे सांगली जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.
तसेच लोकसभा निवडणुकीत अपयश आल्यावर अजित पवारांबाबत चर्चा सुरू झाली होती. मात्र विधानसभेतील यश, सत्ता टिकवणे आणि उपमुख्यमंत्रिपद पुन्हा मिळवणे या सगळ्यांनी अजित पवारांनी आपली ताकद पुन्हा सिद्ध केली.
आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक दिग्गज नेते त्यांच्या गटात सामील होण्यास उत्सुक आहेत. या चार माजी आमदारांमध्ये शिराळ्याचे माजी मंत्री शिवाजीराव नाईक, जतचे माजी आमदार विलासराव जगताप, कवठेमहांकाळचे माजी मंत्री अजित घोरपडे, आणि आटपाडीचे माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख यांचा समावेश आहे.
दरम्यान, या नेत्यांनी मिरज येथील सरकारी विश्रामगृहात झालेल्या गुप्त बैठकीत सहभाग घेतला होता. बैठकीत अजित पवार गटाचे नेते निशिकांत पाटील देखील उपस्थित होते.
या बैठकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सामील होण्याबाबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर अजित पवारांशी थेट चर्चा होणार असून, त्यानंतर पक्षप्रवेशाची अधिकृत घोषणा होईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.