अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणुकीत ट्विस्ट, तिसऱ्या अपत्यावरुन राडा होताच अखेर सभापती राम शिंदेंची निवडणुकीतून माघार

अहिल्यानगर : राज्यात सध्या जिल्हा बँकांच्या निवडणुकांचीही रणधुमाळी सुरू आहे. सांगली, कोल्हापूर, अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती बँकांसाठी राजकीय पक्षांकडून उमेदवारी अर्ज दाखल केले जात आहेत. असे असताना अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी विधानपरिषद सभापती राम शिंदे यांच्याकडून उमेदवारी दाखल करण्यात येणार होती.
असे असताना तीन अपत्ये असल्याने त्यांची उमेदवारी अपात्र असल्याचं विरोधकांनी म्हटले. आता राम शिंदे यांनी स्पष्टीकरण दिलं असून आपण उमेदवारी अर्ज दाखल करणार नसल्याचेही जाहीर केले. याबाबत शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी आवाज उठवला होता. अखेर शिंदे यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे.

सहकार कायद्यातील निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवारी करणाऱ्या व्यक्तीला 2002 नंतर तिसरे अपत्य जन्माला आले असेल तर ती व्यक्ती सहकारी संस्थेची कोणतीही निवडणूक लढवू शकत नाही. सहकाराचा हाच नियम भाजप नेते विधानपरिषद सभापती राम शिंदे यांच्यासाठी अडचणीचा ठरला. राम शिंदे म्हणाले, कोणत्याही राजकीय दबावामुळे किंवा व्यक्तिगत कारणामुळे हा निर्णय घेतलेला आहे.


घटनात्मक पदाची प्रतिष्ठा आणि निष्पक्षता जपण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल न करण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितले. दोन संस्थांच्या माध्यमातून आपला ठराव बिनविरोध झाल्याचा दावा देखील यावेळी त्यांनी केला. तसेच, दोन तालुक्यांत ठराव होण्यावरुन निर्माण झालेल्या वादावरही त्यांनी भाष्य केलं. कर्जत तालुक्यातील बारडगाव सुद्रिक आणि जामखेड तालुक्यातील दिसलेवाडी या दोन संस्थांच्या माध्यमातून आपला ठराव करण्यात आला.
हा ठराव बिनविरोध झाल्याचं सांगत त्यांनी कर्जत-जामखेडमधील कार्यकर्त्यांच्या संघटनात्मक तयारीचं कौतुक केलं. राम शिंदे यांच्या उमेदवारी अर्जावरुन प्रचंड राजकीय गोंधळ उडाला होता, आरोप – प्रत्यारोप झाले होते, राम शिंदे यांना तीन आपत्य असल्याने त्यांचा अर्ज टिकू शकत नाही, असं त्यांचे राजकीय विरोधक रोहित पवार यांनी देखील म्हटले होते.
