‘मी खरंच सांगतो, समाधान सगळ्यांचंच होणार नाही’; कर्जमाफीच्या वादात कृषिमंत्री भरणेंचं मोठं विधान, रोहित पवारांसोबत मंगळवारी होणार निर्णायक बैठक

पंढरपूर : राज्यातील शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले असताना कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी महत्त्वाचे विधान करत सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याच्या मागणीसाठी पंढरपूरमध्ये अन्नत्याग आंदोलन सुरू केलेल्या आमदार रोहित पवार यांच्या आंदोलनादरम्यान भरणे यांनी संवादाचा मार्ग स्वीकारण्याचे संकेत दिले आहेत. मात्र त्याचवेळी “मी खरंच सांगतो, समाधान सगळ्यांचंच होणार नाही,” असे वक्तव्य करून त्यांनी चर्चेला नवे वळण दिले आहे.

राज्य सरकारने नुकतीच कर्जमाफीची घोषणा केली असली तरी त्यातील काही अटींवरून शेतकरी संघटना आणि विरोधकांकडून आक्षेप घेतले जात आहेत. सरकारने घातलेल्या अटींमुळे अनेक पात्र शेतकरी लाभापासून वंचित राहतील, असा दावा करत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी पंढरपूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत सर्व शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होत नाही आणि जाचक अटी मागे घेतल्या जात नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे.
या पार्श्वभूमीवर कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, शेतकऱ्यांच्या भावना आणि मागण्या सरकारपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी ते पार पाडणार आहेत. रोहित पवारांनी दिलेले निवेदन मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

भरणे यांनी सांगितले की, आंदोलन सुरू झाल्यानंतर त्यांनी दोन वेळा रोहित पवार यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही संवाद साधण्यात आला. मुख्यमंत्री स्वतः या विषयावर चर्चा करण्यास तयार असून मंगळवारी विशेष बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत रोहित पवारांच्या नेमक्या मागण्या, शेतकऱ्यांच्या अडचणी आणि कर्जमाफीतील वादग्रस्त अटी यावर सविस्तर चर्चा होणार आहे.

“रोहित दादांच्या मनात कोणते प्रश्न आहेत, कोणत्या अटींवर आक्षेप आहे आणि त्यातून कोणता मार्ग निघू शकतो, यावर बैठकीत विचार होईल. मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील, असा मला विश्वास आहे,” असे भरणे म्हणाले.
कर्जमाफीच्या निर्णयाबाबत बोलताना त्यांनी राज्याच्या आर्थिक परिस्थितीचाही उल्लेख केला. “राज्याच्या तिजोरीवर मोठा ताण असतानाही मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. काही अटी आवश्यक आहेत. सर्व शेतकऱ्यांचे शंभर टक्के समाधान होईल असे नाही, पण मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे,” असे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, रोहित पवारांच्या आंदोलनाला राज्यभरातून प्रतिसाद मिळत असून शेतकरी संघटनाही सरकारच्या भूमिकेकडे लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे मंगळवारी होणारी बैठक केवळ आंदोलनाचा मार्ग ठरवणारी नसून राज्यातील कर्जमाफीच्या राजकारणाला नवे वळण देणारी ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.