पुण्यात मराठा समाज आक्रमक! नामदेव शास्त्रींचे कीर्तन रद्द, थेट इशाराच दिला…

बीड : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख अपहरण आणि हत्या प्रकरणावरून मंत्री धनंजय मुंडे यांची पाठराखण करणाऱ्या नामदेव शास्त्रींच्या कार्यक्रमाला विरोध होताना दिसत आहे.
तसेच या पार्श्वभूमीवर भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केली. यानंतर मराठा समाज आक्रमक झाला असून नामदेवशास्त्री यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात येत आहे.
दरम्यान, नामदेव शास्त्री यांचा देहू येथील भंडारा डोंगरावर ७ फेब्रुवारीला प्रवचनाचा आणि कीर्तनाचा कार्यक्रम होणार होता. या कार्यक्रमाला मराठा समाजाने विरोध केला आहे. नामदेव शास्त्री यांचे कीर्तन रद्द करावे याबाबतचे निवेदन अखंड मराठा समाज संघटनेच्या माध्यमातून कार्यक्रमाच्या आयोजकांना देण्यात आले होते.
निवेदनात असे म्हटले होते की, नामदेव शास्त्री महाराज यांनी बीड मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंधित असलेले आरोपी यांच्याबाबतीत समर्थनाची भूमिका घेतली. याबाबतची व्हिडिओ क्लिप समाज माध्यमातून व्हायरल होत आहे. ज्या मंत्र्याच्या पाठबळावर आरोपीनी हे कृत्य केले. त्या मंत्र्याने जनतेचा रोष समजून राजीनामा द्यायला हवा. तर हे नामदेव शास्त्री महाराज त्यांची पाठराखण करत असल्याची गोष्ट समोर आली आहे.
वास्तविक पाहता सांप्रदायिक क्षेत्रातील महाराज लोकांनी जातीपासून, पुढारी लोकांपासून, गुन्हेगारी करणाऱ्या लोकांपासून चार हात लांब राहायला हवे. परंतु हे महाशय आरोपींना निकटवर्तीय म्हणणाऱ्या लोकांना सांप्रदायिक क्षेत्रात असता, तर संत झाला असता अशी उपमा देतात. हे महाराष्ट्राच्या साधू संताच्या भूमीला कधीच पटणारे नाही.
दरम्यान, महाराष्ट्राच्या संत परंपरेला नामदेव सानप यांनी काळिमा फसला आहे. त्यामुळे त्यांचे कीर्तन पुरोगामी आणि संताच्या भूमीमध्ये करण्यास त्यांना कोणताही अधिकार नाही. जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज संस्थान यांनी त्यांचे कीर्तन, प्रवचन रद्द करावे, अशी विनंती अखंड मराठा समाज यांच्यावतीने करण्यात आली आहे.