बुलढाण्यात टक्कल व्हायरसनंतर आता नवा आजार, लोकांमध्ये भीतीचे वातावरण, नेमकं होतंय काय?

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव, नांदुरा आणि खामगाव तालुक्यात गेल्या डिसेंबरपासून सुरू झालेल्या केसगळतीच्या गूढ प्रकाराला आता गंभीर वळण लागले आहे. ज्या नागरिकांना केसगळतीचा त्रास झाला होता, आता त्यांची नखे गळू लागल्याने परिसरात भीती आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे.
या परिस्थितीमुळे आता या परिसरातील नागरिक दहशतीत आहेत. गेल्या डिसेंबर महिन्यापासून नागरिकांची फक्त तपासणी झाली. ICMR चे पथक आले. अनेक वेळी रक्ताचे नमुने घेतल्या गेलेत. मात्र, औषध उपचाराच्या नावावर रुग्णांना काहीच दिले नसल्याचा आरोप करत आरोग्य व जिल्हा प्रशासनाने रुग्णांना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
अद्यापही ICMR चा अहवाल जाहीर करण्यात आलेला नसल्याने सरकार नेमक काय लपवू पाहत आहे? यावर नागरिकांना शंका येत आहे. या परिसरात अतिशय धक्कादायक चित्र असून नक्की हा कुठला आजार आहे? या बद्दल नागरिक साशंक आहेत.
या प्रकरणी बुलढाणा आरोग्य अधिकारी (वर्ग १) डॉ. अनिल बनकर यांनी माहिती दिली आहे. त्यांच्यानुसार, सध्या चार गावांमध्ये नखांच्या समस्येने त्रस्त असलेले एकूण २९ रुग्ण आढळून आले आहेत, ज्यांना आधी केसगळतीचा त्रास झाला होता. या रुग्णांमध्ये नखे कमकुवत होणे आणि गळून पडणे अशी लक्षणे दिसत आहेत.
दरम्यान, या २९ रुग्णांवर प्राथमिक उपचार करण्यात आले असून, त्यांना पुढील उपचारांसाठी शेगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. शरीरातील सेलेनियमचे प्रमाण वाढल्यामुळे ही समस्या उद्भवत असावी, असा प्राथमिक अंदाज आरोग्य विभागाने व्यक्त केला आहे. निश्चित कारण मात्र आयसीएमआरच्या अहवालानंतरच स्पष्ट होऊ शकेल.