“त्या” निर्णयानंतर मी वेगळी वाट निवडेन; रोहित पवारांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ

मुंबई : राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलिनीकरणाच्या चर्चांमध्ये आता नव्या घडामोडींनी रंग भरला आहे. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी शरद पवार गट आणि अजित पवार गट पुन्हा एकत्र येणार का, याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. त्यातच आमदार रोहित पवार यांनी केलेल्या एका वक्तव्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

बुधवारी शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षातील महत्त्वाच्या नेते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत दोन्ही राष्ट्रवादी गटांच्या विलिनीकरणाबाबत स्पष्ट भूमिका जाहीर करण्याची मागणी काही पदाधिकाऱ्यांनी केली होती. कारण गेल्या काही दिवसांपासून मागच्या दाराने चर्चा सुरू असल्याच्या चर्चांना उधाण आले होते.
यानंतर खासदार सुप्रिया सुळे आणि ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी पक्षाचे विलिनीकरण होणार नसल्याचे स्पष्ट केले. मात्र त्यानंतरही चर्चांचा धुरळा शांत झालेला नाही.

दरम्यान, एका मुलाखतीत रोहित पवार यांना थेट प्रश्न विचारण्यात आला की, “समजा भविष्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाने एनडीएसोबत जाण्याचा निर्णय घेतला, तर तुमची भूमिका काय असेल?” या प्रश्नावर रोहित पवार यांनी दिलेलं उत्तर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

“अशी वेळ आली तर मी दुसरा पर्याय निवडेन; पण भाजपसोबत जाणार नाही,” असे स्पष्ट शब्दांत त्यांनी सांगितले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा समोर आल्याची चर्चा रंगू लागली आहे.
विशेष म्हणजे, “दुसरा पर्याय म्हणजे काँग्रेससोबत जाणार का?” असा पूरक प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी थेट उत्तर देणं टाळलं. त्यामुळे त्यांच्या भविष्यातील राजकीय भूमिकेबाबत आता अधिक उत्सुकता निर्माण झाली आहे.
रोहित पवार यांच्या या विधानामुळे राज्यातील राजकीय समीकरणांबाबत नव्या चर्चांना सुरुवात झाली असून आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणखी मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.