पेट्रोल-डिझेलनंतर आता ‘किचन बजेट’वर मोठा आघात! खाद्यतेलाच्या दरात झपाट्याने वाढ; पाम तेलही महागण्याचे संकेत, सामान्यांच्या खिशाला बसणार जबर झळ!


नागपूर : पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचा फटका अजून थांबलेला नसतानाच आता थेट सामान्यांच्या स्वयंपाकघरावर महागाईचा मोठा प्रहार होत असल्याचे चित्र दिसत आहे. खाद्यतेलाच्या दरात गेल्या दोन महिन्यांत सातत्याने वाढ होत असून बाजारात पुन्हा एकदा भाववाढीची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे गृहिणी आणि सामान्य ग्राहकांच्या चिंता वाढल्या आहेत.

नागपूरमधील बाजारपेठेत मिळालेल्या माहितीनुसार, खाद्यतेलाच्या किमतीत प्रति किलो मागे तब्बल 10 ते 15 रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील अस्थिरता, इंधन दरवाढ आणि आयात खर्च वाढल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. विशेषतः पाम तेल, जे मोठ्या प्रमाणात विदेशातून आयात केले जाते, त्याच्या किमतीतही वाढ दिसून येत आहे.

व्यापाऱ्यांच्या माहितीनुसार, सध्याची बाजारातील स्थिती पाहता पुढील काही दिवसांत पाम तेलासह इतर खाद्यतेलांच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आधीच महागाईने त्रस्त असलेल्या सामान्य नागरिकांवर आणखी आर्थिक ताण येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, स्थानिक व्यापाऱ्यांनीही देशांतर्गत तेलबिया उत्पादन वाढवण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले आहे. पूर्वी जवस, करडी यांसारख्या तेलबिया मोठ्या प्रमाणात स्थानिक पातळीवर उत्पादित केल्या जात होत्या, मात्र आता आयातीवर अवलंबून राहावे लागत असल्याने दरांवर थेट परिणाम होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

सध्या लग्नसराई नसल्याने आणि उन्हाळ्यामुळे बाजारात मागणी तुलनेने कमी असली तरी भविष्यात परिस्थिती बदलू शकते, असा इशाराही व्यापाऱ्यांनी दिला आहे. जर आंतरराष्ट्रीय बाजारातील तणाव आणि आयात खर्च कायम राहिला, तर खाद्यतेलाचे दर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

एकूणच पेट्रोल-डिझेलनंतर आता खाद्यतेलाच्या दरवाढीने सामान्य कुटुंबांचे मासिक बजेट पूर्णपणे बिघडण्याची भीती निर्माण झाली आहे. पुढील काही दिवसांत दर कसे बदलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!