अजितदादांच्या निधनानंतर सोमेश्वरच्या रणांगणात पुन्हा ‘पवार विरुद्ध पवार’; युगेंद्र पवारांच्या मुलाखती, सुनेत्रा पवारांच्या गाठीभेटींनी बारामतीत राजकीय हालचालींना वेग

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर बारामतीच्या राजकारणात पाहायला मिळालेला पवार विरुद्ध पवार संघर्ष आता पुन्हा एकदा सहकार क्षेत्रातील निवडणुकीच्या निमित्ताने समोर आला आहे. बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून युगेंद्र पवार, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार यांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. अजित पवारांच्या निधनानंतर पवार कुटुंबीय प्रथमच सहकार क्षेत्रातील निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात उभे राहण्याची शक्यता असल्याने सोमेश्वरची निवडणूक चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार असा सामना झाला होता. मात्र, सुप्रिया सुळे यांच्याविरोधात पवार कुटुंबातील उमेदवार देणे ही चूक होती, असे अजित पवारांनी म्हटले होते. यापुढे पवार विरुद्ध पवार असा राजकीय संघर्ष होणार नाही, अशी भूमिकाही त्यांनी मांडली होती. अजित पवारांच्या निधनानंतर सुप्रिया सुळे यांनीदेखील बारामतीत आपल्या बाजूने असा संघर्ष होणार नसल्याचे सांगितले होते. मात्र, सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीमुळे दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा आमनेसामने येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी काही दिवसांपूर्वी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. दुसरीकडे सुनेत्रा पवार यांनीही इच्छुक उमेदवारांच्या गाठीभेटी घेत निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंनी स्वतंत्र पॅनेल उभारण्याच्या हालचालींना वेग आला आहे. अजित पवारांच्या निधनानंतर सहकार क्षेत्रातील ही पहिलीच मोठी निवडणूक असल्याने त्याकडे विशेष लक्ष लागले आहे.


सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत एकूण २१ जागांसाठी ६०१ नामनिर्देशनपत्रे दाखल झाली होती. छाननीनंतर ५५६ अर्ज पात्र ठरले, तर त्यानंतर ४५ उमेदवारांनी माघार घेतली. सुनावणीनंतर ४२ अर्ज बाद झाल्याने अंतिम यादीत ५१४ उमेदवार राहिले आहेत. सर्वाधिक इच्छुक मांडकी-जवळार्जुन गटातून असल्याची माहिती आहे. त्यामुळे प्रत्येक गटासमोर इच्छुकांमधून अंतिम पॅनेल निवडण्याचे मोठे आव्हान आहे.
या निवडणुकीत केवळ दोन्ही राष्ट्रवादीच नाही, तर भाजप आणि शिवसेनेकडूनही स्वतंत्र पॅनेल उभे करण्याच्या हालचाली सुरू आहेत. शिवसेना आमदार विजय शिवतारे यांनी निवडणूक स्वबळावर लढण्याची भूमिका जाहीर केली आहे, तर भाजपकडूनही स्थानिक पातळीवर भूमिका निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे सोमेश्वरच्या निवडणुकीत बहुकोनी लढतीची शक्यता निर्माण झाली आहे.
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये युती होणार का, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. आमदार रोहित पवार यांनी चर्चेतून मार्ग काढून निवडणूक लढवण्याबाबत भूमिका मांडली होती. मात्र, सुनेत्रा पवार यांच्या गटासोबत अद्याप युतीबाबत चर्चा झालेली नसल्याची माहिती आहे. त्यामुळे युती झाली तर एकत्रितपणे, अन्यथा स्वतंत्र पॅनेल उभारून निवडणूक लढवण्याची तयारी दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांकडून सुरू असल्याचे चित्र आहे.
दरम्यान, सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभाही चर्चेत आली आहे. वार्षिक अहवालात खासदार पार्थ पवार यांचा फोटो नसल्याच्या मुद्द्यावर शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे यांनी टीका केली होती. या मुद्द्यावर कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिलगिरी व्यक्त केली. या घडामोडींमुळे निवडणुकीपूर्वीच कारखान्यातील राजकीय वातावरण तापले आहे.
आता सर्वांचे लक्ष ३० सप्टेंबरपर्यंतच्या उमेदवारी अर्ज माघारीच्या प्रक्रियेकडे लागले आहे. कोणते इच्छुक माघार घेतात, कोणते पॅनेल अंतिम होते, दोन्ही राष्ट्रवादींमध्ये तडजोड किंवा युती होते का आणि निवडणूक बिनविरोध करण्यासाठी शेवटच्या टप्प्यात प्रयत्न होतात का, यावर सोमेश्वरच्या निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. त्यानंतर २ ऑक्टोबरला अंतिम उमेदवार यादी आणि चिन्हांचे वाटप, तर ११ ऑक्टोबरला मतदान आणि १२ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.