पुण्यातील भाजपच्या मंत्र्याच्या ऑफिसात मोक्काचा आरोपी? रवींद्र धंगेकरांचा थेट हल्ला! जिल्ह्यात खळबळ….

पुणे : शिवसेना नेते रविंद्र धंगेकर यांनी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात गंभीर आरोप करत नवा राजकीय बॉम्ब फोडला आहे. धंगेकरांनी असा दावा केला आहे की, चंद्रकांत पाटलांच्या कार्यालयात मोक्काचा आरोपी समीर पाटील नावाचा व्यक्ती काम करतो.

तो गुन्हेगारी रॅकेट चालवतो, पोलिसांवर दादागिरी करतो आणि चंद्रकांत दादांचा फोन वापरून पोलिसांच्या बदल्या घडवतो, असा आरोप त्यांनी केला आहे. या विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

रविंद्र धंगेकरांच्या आरोपांवर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. धंगेकर आमदार नाहीत, चर्चेत राहण्यासाठी असे आरोप करतात,” असे दरेकर म्हणाले. त्यावर धंगेकरांनी चोख पलटवार करत, दरेकर पुण्यात राहत नाहीत, त्यांना पुणेकरांच्या व्यथा माहीत नाहीत. मी त्यांना पुण्यात बोलावणार आहे, लोक काय म्हणतात ते ऐकवणार, असे म्हणत प्रत्युत्तर दिले.

यानंतर धंगेकर म्हणाले, दरेकरांना पद मिळते कारण ते कोणाच्यातरी ताटाखालचं मांजर आहेत. पण मला बोलायचा अधिकार लोकशाहीने दिला आहे. त्यांनी चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधत म्हटलं, चंद्रकांत दादा गुन्हेगारांना पाठीशी घालतात. त्यांच्या कार्यालयात गुन्हेगार काम करतात आणि तेच दादांच्या नावाने पोलिसांना धमकावतात.
धंगेकरांनी आणखी तीव्र शब्दांत म्हटलं, चंद्रकांत दादांना पुण्यातून लोक लाखोंनी निवडून देतात, पण ते गुंडगिरी वाढवतात. त्यांनी वेळेत कोथरूडमधील गुन्हेगारी आवरली नाही तर हा काळा डाग मरेपर्यंत आणि मेल्यानंतरही त्यांच्यावर लागलेला राहील.
याचबरोबर त्यांनी पोलिस तपासाची मागणी करत म्हटलं, पोलिसांना गोळ्या सापडल्या आहेत, पण आता जिवंत काडपूस नाही, तर जिवंत माणसं गाडलेली सापडतील. राजकारणाने यात हस्तक्षेप करू नये.” या वक्तव्यामुळे राजकीय वातावरणात एकच खळबळ उडाली असून, प्रशासनावर दबाव वाढला आहे.
