शिरूर येथील फाकटेमध्ये नकुशा तांबे आत्महत्या प्रकरणी आरोपींची पाच वर्षांनंतर निर्दोष मुक्तता…

शिरूर : शिरूर तालुक्यातील फाकटे गावातील नकुशा अनिल तांबे (वय २५) हिच्या आत्महत्येप्रकरणी तिचा पती अनिल चिंधू तांबे, सासरा चिंधू सिदू तांबे आणि सासू मुक्ताबाई चिंधू तांबे यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

सोमवारी (२१ जुलै २०२५) पुणे येथील एस.जी.जोशी यांच्या न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याचा निकाल जाहीर करण्यात आला. नकुशा अनिल तांबे या विवाहितेच्या दुर्दैवी मृत्यूनंतर तिचे वडील मालू गोपाळा करगळ यांनी २० नोव्हेंबर २०१९ रोजी शिरूर पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळींविरोधात नकुशाचा छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करत, गुन्हा दाखल केला होता.
त्यानंतर शिरूर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून संबंधित तीनही आरोपींच्या विरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले होते. दरम्यानच्या काळात न्यायालयीन सुनावणीमध्ये अनेक साक्षीदारांची साक्ष नोंदवून घेण्यात आली. त्याचप्रमाणे साक्षीदारांची उलट तपासणीही झाली.

तसेच अंतिम युक्तिवादात आरोपींच्या वतीने बचाव पक्षाच्या वकिलांनी युक्तिवाद करताना, मयत नकुशा तांबे हिला सासरी चांगली वागणूक देण्यात येत होती. तसेच तिचे चारित्र्यही संशयित नव्हते. नकुशा विहिरीवर पाणी भरताना तोल जाऊन विहिरीत पडली आणि दुर्दैवाने तिचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.अशी बाजू न्यायालयात पुराव्यांसह मांडली.

दरम्यान, त्यानंतर बचाव पक्षाच्या युक्तिवादाला दुजोरा देत आणि आरोपींवर आरोप सिद्ध होण्यासारखे ठोस पुरावे सरकारी पक्षाच्या वकिलांकडे नसल्याने, कोर्टाने तीनही आरोपींना निर्दोष मुक्त केले.
या खटल्यात आरोपींच्या वतीने ॲड.स्वप्नील सातव, ॲड.मयूर करचे, ॲड.मृणाल भोईटे, ॲड.शुभम कावळे, ॲड.तृप्ती पवार आणि ॲड.तुषार तांदळे इत्यादी वकिलांनी अभ्यासपूर्ण व मुद्देसूद युक्तिवाद केला. त्यामुळे कोर्टाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.