Accident News : आईसमोरच मुलाने सोडला जीव! पाटस – दौंड अष्टविनायक रस्त्यावर भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनाने विद्यार्थ्याला उडवले….

Accident News : दौंड ते पाटस अष्टविनायक राज्य मार्गावर दौंड तालुक्यातील बिरोबावाडी येथे शालेय विद्यार्थी रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगाने आलेल्या मालवाहतूक करणाऱ्या पिकअप जीप गाडीने एका विद्यार्थ्याला उडवल्याने भीषण अपघाताची धक्कादायक घटना घडली.

आयुष राजेश यादव (वय ८, सध्या राहणार बिरोबा वाडी तालुका दौंड, जिल्हा पुणे) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे.
सविस्तर माहिती अशी की, बिरोबावाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता दुसरी या विद्यार्थ्याचा प्रवेश घेण्यासाठी मागील चार दिवसापूर्वी पालकांनी शाळेत येऊन शिक्षकांना विचारपूस केली होती. आणि शुक्रवारी शाळेचा पहिला दिवस असल्याने आयुष हा आई हिरादेवी त्याच्यासोबत शाळेत हाताला धरुन तो शाळेच्या दिशेने चालला होता.

मात्र वर्गात पाय ठेवण्याअगोदरच काळाने घाला घातला. रस्ता ओलांडत असताना पाटस बाजूकडून दौंड दिशेला भरधाव वेगाने जाणाऱ्या मालवाहतूक पिकअप जीप गाडीने जोरदार धडक दिली. Accident News

या अपघातात आयुषला डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. आईच्या समोरच ही घटना घडल्याने आईने जागी टाहो फोडला, काही क्षणात तीही बेशुद्ध अवस्थेत रस्त्यावर पडली.हृदय हेलावणाऱ्या या थरारक घटनेमुळे बिरोबावाडी परिसरात शोककळा पसरली.
या घटनेचा निषेध म्हणून काही क्षणात ग्रामस्थांनी रस्त्यावर ठिय्या मांडत रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनात माजी आमदार रमेश थोरात हेही सहभागी झाले.
सकाळी साडे नऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत तब्बल साडेतीन – चार तास ग्रामस्थांनी रस्त्यावर ठिय्या मांडत आक्रमक पवित्रा घेतला. रस्त्याच्या दोन्ही बाजूला गतिरोधक करण्याची मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, दौंड पोलीस निरीक्षक संतोष डोके तसेच पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
दौंड तहसील कार्यालयाचे निवासी नायब तहसीलदार तुषार बोरकर, मंडलाधिकारी सुनील गायकवाड, तलाठी संतोष येडुळे यांनी घटनास्थळी भेट देऊन ग्रामस्थांची चर्चा करून अष्टविनायक महामार्ग प्रशासनाची चर्चा करून या ठिकाणी संध्याकाळी चार वाजेपर्यंत प्लास्टिक गतिरोधक बसविण्यात येतील तसेच चार दिवसात त्या ठिकाणी डांबरीकरणाचा गतिरोधक केले जाईल असे आश्वासन दिले.