बहिणीच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी भावाचा धक्कादायक डाव; पाणीपुरीच्या ठेल्याजवळ मेहुण्यावर कोयत्याने वार, सेल्फी व्हिडिओने खळबळ

निझामाबाद : बहिणीचा संशयास्पद मृत्यू, पतीवर खुनाचा आरोप आणि त्यानंतर जामिनावर सुटलेला मेहुणा… या सगळ्याचा राग मनात ठेवून एका १९ वर्षीय तरुणाने भररस्त्यात आपल्या मेहुण्यावर कोयत्याने हल्ला करून त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना तेलंगणातील निझामाबादमध्ये घडली आहे. जी. संतोष याने सी. हरी बाबू याची हत्या केल्याचा आरोप असून, या घटनेनंतर त्याने स्वतःचा चित्रफितीतील व्हिडिओ प्रसारित करून बहिणीच्या मृत्यूचा बदला घेतल्याचा दावा केल्याने प्रकरणाला आणखी गंभीर वळण मिळाले आहे.
निझामाबाद शहरातील शिवाजीनगर परिसरात हरी बाबू एका पाणीपुरीच्या ठेल्याजवळ उभा होता. तो पाणी पीत असतानाच रस्त्यावर एक पांढरी कार येऊन थांबली. कारमधून एक व्यक्ती खाली उतरली आणि हातात कोयता घेऊन थेट हरी बाबूच्या दिशेने धावत गेली. सीसीटीव्ही चित्रणानुसार त्याने हरी बाबूच्या डोक्यावर आणि मानेवर वार केले. हल्ल्यात गंभीर जखमी झालेला हरी बाबू जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. त्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाला.

या घटनेनंतर गुरुवारी रात्री उशिरा संतोषचा असल्याचे सांगितले जाणारे चित्रफितीतील निवेदन समाजमाध्यमांवर प्रसारित झाले. आपणच हरी बाबूची हत्या केली असून बहिणीच्या मृत्यूचा बदला घेतल्याचा दावा त्याने केला. न्याय मिळण्याची अनेक महिने वाट पाहिल्यानंतर हे पाऊल उचलल्याचेही त्याने म्हटल्याचे समोर आले आहे. तसेच आपण पोलिसांसमोर आत्मसमर्पण करणार असल्याचे त्याने सांगितले.


या हत्येमागे काही महिन्यांपूर्वी घडलेला वैष्णवीच्या मृत्यूचा प्रकार असल्याचे पोलिस तपासातून समोर आले आहे. २० वर्षीय वैष्णवीचा १७ मार्च रोजी जगतियाल जिल्ह्यातील माहेरी मृत्यू झाला होता. तिच्या मृत्यूप्रकरणी पती हरी बाबू प्रमुख संशयित होता. पोलिसांनी त्याला अटक केली होती. मात्र, जुलैमध्ये त्याला जामीन मिळाला आणि त्यानंतर तो उदरनिर्वाहासाठी मक्याची विक्री करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
वैष्णवी आणि हरी बाबू यांचा विवाह तिच्या मृत्यूपूर्वी सुमारे वर्षभर आधी झाला होता. हुंड्याच्या मागणीमुळे वैष्णवी त्रस्त असल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला होता. त्यामुळे ती सासर सोडून माहेरी आली होती. तिला परत घेण्यासाठी हरी बाबू माहेरी आला आणि त्याने त्या रात्री तिथे मुक्काम केला. मात्र, दोघे वेगवेगळ्या खोल्यांमध्ये झोपले होते.
वैष्णवीच्या आयुष्यातील शेवटचे काही तासही या प्रकरणातील महत्त्वाचा दुवा ठरले आहेत. मृत्यूच्या काही तास आधी तिने समाजमाध्यमांवर आपण आई होणार असल्याची आनंदाची बातमी सांगणारा व्हिडिओ प्रसिद्ध केला होता. मात्र, त्यानंतर काही तासांतच तिच्या आईला ती गंभीर जखमी अवस्थेत आढळली. तिच्या छातीवर आणि मानेवर चाकूने वार केल्याच्या जखमा होत्या. गळा दाबल्याचाही संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. या घटनेनंतर हरी बाबू घरातून फरार झाला होता.
वैष्णवी समाजमाध्यमांवरही मोठ्या प्रमाणात सक्रिय होती. ती आपल्या वैवाहिक आयुष्याशी संबंधित चित्रफिती आणि रील्स प्रसिद्ध करत असे. तिच्या युट्युब वाहिनीवर ५० हजारांहून अधिक सदस्य असल्याचे सांगितले जाते. तिच्या समाजमाध्यमांवरील लोकप्रियतेवरूनही पती नाराज असल्याचा दावा करण्यात आला होता; मात्र या दाव्याची स्वतंत्र पुष्टी झालेली नाही.
दरम्यान, हरी बाबूच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून सीसीटीव्ही चित्रण, घटनास्थळावरील पुरावे आणि संतोषच्या कथित चित्रफितीतील निवेदनाच्या आधारे पुढील कारवाई केली जात आहे. बहिणीच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी झालेल्या या हत्येने निझामाबादमध्ये खळबळ उडाली आहे.