व्याजाने दिलेले पैसे भोवले ! व्याजाचे पैसे शिविगाळ करुन माघितले म्हणून तरुणावर दाखल झाला अॅट्रासिटी गुन्हा ….

पुणे : व्याजाने पैसे दिले असताना ते परत करण्याविषयी वारंवार मागणी करताना जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप एका महिलेने केला असून येरवडा पोलिसांनी तरुणावर अॅट्रासीटीबरोबर बेकायदा सावकारी कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे.
रवींद्र राजेंद्र राजगुरु (रा. नवी खडकी) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी लोहगावमधील महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार येरवड्यामध्ये मार्च २०२० ते सप्टेंबर २०२४ दरम्यान घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादीच्या तोंड ओळखीचा मित्र आहे. त्याने फिर्यादी यांना व्याजाने पैसे दिले होते. त्याचे मुद्दल व व्याज असे एकूण ६२ लाख रुपये झाले आहेत. या पैशांची वारंवार मागणी करुन फिर्यादी यांना हाताने व बेल्टने मारहाण केली.त्यांच्या पाठीवरुन हात फिरवून त्यांच्याशी अश्लिल चाळे केले. त्यांच्या जातीवरुन जातीवाचक शिवीगाळ केली.
फिर्यादी यांना तू लय मोठी झाली आहे का असे म्हणून दुकानाची चावी मागून सतत व्याजाने दिलेल्या पैशांची मागणी करीत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे तपास करीत आहेत.