अभिजीत दिपके ॲक्शन मोडमध्ये! सप्टेंबरमध्ये घेणार मोठा निर्णय; पक्षाची नवी दिशा ठरणार


मुंबई : कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी पक्षाच्या आगामी वाटचालीबाबत मोठी घोषणा केली आहे. छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या दोन दिवसीय बैठकीनंतर त्यांनी पक्षाची भविष्यातील भूमिका, देशव्यापी जनसंवाद मोहीम आणि आगामी कार्यक्रमांची माहिती दिली. सप्टेंबर महिन्यात पक्षाची पुढील दिशा आणि धोरण जाहीर करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

दोन दिवस चाललेल्या बैठकीत पक्षाचे प्रमुख पदाधिकारी सहभागी झाले होते. बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना दिपके यांनी 25 जुलैच्या आंदोलनाचा उल्लेख करत, देशातील तरुणांनी सरकारला निर्णय बदलण्यास भाग पाडल्याचा दावा केला. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचा उल्लेख करत त्यांनी तो पक्षाचा मोठा विजय असल्याचे म्हटले. अनेक वर्षांपासून सरकारने निर्माण केलेले भीतीचे वातावरण आता कमी होत असल्याचाही दावा त्यांनी केला.

यावेळी त्यांनी सांगितले की, सप्टेंबरमध्ये पक्षाच्या पुढील राजकीय वाटचालीची घोषणा केली जाईल. तसेच विविध सामाजिक आणि राष्ट्रीय प्रश्नांवर नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

अभिजीत दिपके यांनी CJP ची विचारधारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या विचारांवर आधारित असल्याचे सांगितले. संविधानातील मूल्यांवर विश्वास ठेवत लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वांनुसार पक्ष काम करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

देशभरातील नागरिकांशी थेट संवाद साधण्यासाठी राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो यात्रा’च्या धर्तीवर जनसंवाद अभियान राबविण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. या मोहिमेद्वारे नागरिकांच्या समस्या, अपेक्षा आणि स्थानिक प्रश्न जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाईल.

याशिवाय, डिसेंबर महिन्यात ‘क्या बोलती पब्लिक’ या नावाने देशव्यापी जनसंपर्क मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहितीही दिपके यांनी दिली. या अभियानातून विविध राज्यांतील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी आणि अपेक्षा जाणून घेतल्या जातील.

शिक्षण, बेरोजगारी आणि तरुणांच्या प्रश्नांवर पुरेशी चर्चा होत नसल्याची टीका करत, हे विषय देशभर प्रभावीपणे मांडण्यासाठी CJP थेट जनतेमध्ये जाऊन संवाद साधणार असल्याचे अभिजीत दिपके यांनी सांगितले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!