भयंकर!! मध्यरात्री बाईकवर महिलेचा मृतदेह घेऊन फिरत होता तरुण, पोलिसांना दिसला अन् पुण्याला हादरवणारा कांड झाला उघड…

पुणे : पुण्यातील नांदेड सिटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या ठिकाणी इथं मध्यरात्री दीडच्या सुमारास एक तरुण बाईकवर महिलेचा मृतदेह घेऊन फिरत होता. यावेळी गस्तीवर असलेल्या पोलिसांनी त्याला हटकलं.
त्याची विचारपूस केली असता पुण्याला हादरवणारं हत्याकांड समोर आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी त्वरित कारवाई करत आरोपी तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत. राकेश रामनायक निसार असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे.
मध्यरात्री दीड वाजता आरोपी राकेश एका महिलेचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं. यावेळी पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता, संबंधित मृतदेह दुसरा तिसरा कुणाचा नव्हे तर त्याच्याच पत्नीचा असल्याचं तपासात निष्पन्न झालं. बबीता राकेश निसार असं मयत पत्नीचं नाव आहे.
सविस्तर माहिती अशी की, सोमवारी रात्री उशिरा आरोपी राकेश याने पत्नी बबीताची गळा दाबून हत्या केली होती. पत्नीची हत्या केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तो चक्क दुचाकीवरून प्रवास करत होता. तो पत्नीचा मृतदेह घेऊन भूमकर पुलाकडून स्वामीनारायण मंदिराच्या दिशेने निघाला होता. त्यावेळी आंबेगाव आणि भारती विद्यापीठ पोलिसानी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.