महिला सरपंचाचा विहिरीतून पाणी काढताना पाय घसरून पडल्याने बुडून मृत्यू, शिरूरच्या नागरगावातील घटनेने हळहळ..

पुणे : शिरूर येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जनावरांसाठी विहिरीतून पाणी काढताना पाय घसरून पाण्यात पडल्याने महिला सरपंचाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी (ता.१०) या दिवशी सकाळी घडली आहे.

नागरगाव (ता. शिरूर) ग्रामपंचायतीच्या सरपंच मंगल शरद शेलार (वय. ४२) असे पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या महिला सरपंचाचे नाव आहे. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, सरपंच मंगल शरद शेलार या नागरगाव ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच होत्या. रविवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास जनावरांकरिता पाणी काढण्यासाठी घरामागील विहिरीवर गेल्या होत्या. सुमारे एक तास उलटूनही त्या घरी न आल्याने कुटुंबीयांनी शेताकडे व शेतातील विहिरीकडे त्यांचा शोध घेतला.

दरम्यान, त्यांचा शोध न लागल्याने त्या विहिरीत पडल्या असाव्यात, असा संशय आल्याने कुटुंबीयांनी व आसपासच्या लोकांनी मोटारी लावून विहिरीतील पाणी उपसले. रात्री सातच्या सुमारास विहिरीतील सर्व पाणी उपसल्यानंतर विहिरीत त्या मृतावस्थेत आढळून आल्या. या घटनेने त्यांच्या घरच्यांवर दुःखाचा डोंगर कोसळा आहे.

पोलिसांनी सदर घटनेत आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रमेश कदम हे करत आहेत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.