८ महिन्यांच्या गर्भवती मावशीसोबत लिव्ह-इन; मोबाईलवरून संशय, गळा आवळून हत्या अन् २ किलो मीठ टाकून अंगणात मृतदेह पुरला!


जयपूर : राजस्थानच्या जयपूरमधील बिंदायका परिसरात लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या ३२ वर्षीय ८ महिन्यांच्या गर्भवती महिलेच्या हत्येने खळबळ उडाली आहे. आरोपी तरुणाचे आणि मृत महिलेचे मावशी-भाच्याचे नाते होते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याचे पोलिस तपासातून समोर आले आहे. महिलेच्या मोबाईलवरील संभाषणावरून संशय घेत आरोपीने तिचा गळा आवळून हत्या केल्याचा आरोप आहे. त्यानंतर मृतदेह घराच्या अंगणात खड्डा खोदून पुरण्यात आला.

जानेवारीपासून जयपूरमध्ये एकत्र वास्तव्य

मृत महिलेचे नाव किरण (३२) असून आरोपीचे नाव प्रवेश रावत (२२) आहे. नात्याने दोघे मावशी-भाचा होते. मात्र, काही महिन्यांपासून ते प्रेमसंबंधात असल्याचे सांगितले जात आहे. जानेवारीमध्ये प्रवेश किरणला तिच्या घरातून घेऊन जयपूरला आला होता. त्यानंतर दोघे एकत्र राहत होते. किरण ८ महिन्यांची गर्भवती होती आणि प्रवेश तिची काळजी घेत असल्याची माहितीही समोर आली आहे.

एका मोबाईलमुळे नात्यात संशयाची ठिणगी

दोघांकडे एकच मोबाईल फोन होता. प्रवेश कामावर जाताना हा फोन किरणकडे ठेवून जायचा. मात्र, किरण मोबाईलवरून अन्य व्यक्तीशी बोलत असल्याचा संशय प्रवेशला आला. यावरून दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. २३ सप्टेंबरच्या सकाळी पुन्हा याच मुद्द्यावरून दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर प्रवेशने किरणचा गळा आवळून तिची हत्या केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.

मृतदेह पुरण्यासाठी घरासमोरच खोदला खड्डा

हत्येनंतर आरोपीने मृतदेह लपवण्यासाठी घराच्या अंगणात खड्डा खोदला. त्यात किरणचा मृतदेह पुरल्यानंतर त्यावर तब्बल २ किलो मीठ टाकल्याचे तपासात समोर आले आहे. मृतदेह लवकर कुजावा, या उद्देशाने त्याने हा प्रकार केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची पद्धत ठरवण्यासाठी आरोपीने गुन्हेगारीवर आधारित चित्रपट पाहिल्याचेही पोलिसांनी सांगितले.

हत्येनंतर मंदिरात दर्शन, कारखान्यात कामही केले

हत्येनंतर प्रवेशने घराला कुलूप लावले आणि सामोद हनुमान मंदिरात दर्शनासाठी गेला. त्यानंतर आपल्यावर संशय येऊ नये म्हणून २५ आणि २६ सप्टेंबरला कारखान्यात नियमित कामावर गेल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र, २६ सप्टेंबरच्या रात्री त्याने आपल्या कुटुंबीयांना किरणच्या मृत्यूची माहिती दिली आणि मोबाईल बंद करून जयपूरमधून पळ काढला.

मोबाईल सुरू होताच पोलिसांनी आरोपीला पकडलं

तपासादरम्यान प्रवेशचा बंद असलेला मोबाईल पुन्हा सुरू झाल्यानंतर पोलिसांना त्याचे लोकेशन मिळाले. त्यानुसार पोलिसांनी उत्तर प्रदेश सीमेजवळून आरोपीला ताब्यात घेतले. सुरुवातीला प्रवेशने किरणने आत्महत्या केली होती आणि भीतीपोटी मृतदेह पुरल्याचा दावा करून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात आले. मात्र, चौकशीनंतर त्याने हत्या केल्याची कबुली दिल्याचा पोलिसांचा दावा आहे.

बिंदायका पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, हत्येचा नेमका घटनाक्रम, आरोपीचा हेतू आणि या प्रकरणातील इतर बाबींचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!