स्पाच्या नावाखाली पुण्यात सुरू होता भयंकर प्रकार, पुण्यातील मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, नेमकं काय घडलं?

पुणे : पुणे शहरातील खराडी भागात मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. खराडी पोलिसांनी केलेल्या या कारवाईत दोन परदेशी महिलांसह सहा तरुणींची सुटका करण्यात आली असून, स्पाच्या व्यवस्थापकाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
स्पाचा मालक विकास किशोर ढाले (वय ३०, रा. माहुली जहांगीर, अमरावती) याच्यावर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, खराडी-मुंढवा रोडवरील थिटे नगर येथील गोल्ड प्लाझा इमारतीमधील ‘सिल्वर ब्युटी अँड वेलनेस’ नावाच्या स्पा सेंटरमध्ये मसाजच्या आड वेश्याव्यवसाय चालत असल्याची गुप्त माहिती खराडी पोलिसांना मिळाली होती. या माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी प्रथम बनावट ग्राहक पाठवला.
दरम्यान, बनावट ग्राहकाकडून हिरवा कंदील मिळताच, पोलिसांनी २४ एप्रिल रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास या स्पा सेंटरवर धाड टाकली. या छाप्यात पोलिसांना दोन परदेशी तरुणींसह एकूण सहा महिला आढळून आल्या, ज्यांची तात्काळ सुटका करण्यात आली आहे.
याप्रकरणी पोलीस अंमलदार पूजा डहाळे यांनी खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी स्पाचा व्यवस्थापक लेनखोकै किपगेन (Lenkhokai Kipgen) (वय ३०, मूळ रा. मणिपूर) याला अटक केली आहे.