पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; एका महिलेचा मृत्यू तर 13 जण गंभीर जखमी..

पुणे : गेल्या काही दिवसापासून शहरात अपघाताचे प्रमाण वाढले असतानाच आता इंदापूर तालुक्यातील मौजे लोणी देवकर गावच्या हद्दीत पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून 13 प्रवासी गंभीर आणि किरकोळ जखमी झाले आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरक्लुझर वाहनाने समोरील अज्ञात वाहनाला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे. या धडकेमुळे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि अपघात घडल्याची माहिती आहे.या अपघातात कर्नाटकातील 50 वर्षीय महिला यल्लावा चौंडकी यांचा मृत्यू झाला असून, 13 प्रवासी गंभीर आणि किरकोळ जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच इंदापूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तात्काळ उपचारासाठी इंदापूर येथील शासकीय रुग्णालय, किटीकेअर हॉस्पिटल आणि भिगवण येथील लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. जखमींमध्ये काहींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर वैद्यकीय देखरेखीखाली उपचार सुरू असल्याची माहिती आहे.
दरम्यान या घटनेतील प्रवासी अंत्यविधी उरकून परत येत असताना हा अपघात घडला आहे.अपघातग्रस्त वाहन रस्त्याच्या कडेला हलवून पोलिसांनी महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली, ज्यामुळे वाहतूक कोंडी टळली
