21 वर्षांत तब्बल 25 वी बदली, तुकाराम मुंढेंच्या ‘सोडणार नाही’च्या इशाऱ्यानंतर राज्यभर धुमाकूळ, अनेक ठिकाणी छापेमारी….

मुंबई : अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच राज्यभरात धडक कारवाईचा सपाटा लावला आहे. प्रतिबंधित गुटखा आणि पानमसाल्याच्या विक्रीविरोधात राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत दोन दिवसांत 40 ठिकाणी छापेमारी करण्यात आली. या कारवाईत 32 जणांना अटक करण्यात आली असून 24 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच सुमारे 12.16 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या कारवाईनंतर तुकाराम मुंढे यांनी आरोग्याशी खेळ करणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेतली असून, “जनतेच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्यांना कोणतीही माफी नाही,” असा स्पष्ट इशारा दिला आहे. त्यामुळे राज्यातील गुटखा आणि पानमसाला विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
दरम्यान, पुणे जिल्ह्यातही अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. आंबेगाव आणि खेड तालुक्यातील पाच ठिकाणी धाड टाकून 19 लाख रुपयांहून अधिक किमतीचा गुटखा, पानमसाला, अप्रमाणित सुपारी आणि संशयित अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. काही ठिकाणी विनापरवाना व्यवसाय सुरू असल्याचेही तपासात उघड झाले आहे.

भ्रामक जाहिरातींवरही प्रशासनाचा बडगा
ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींविरोधातही एफडीएने आक्रमक भूमिका घेतली आहे. उत्पादनांचे अतिरंजित फायदे दाखवून ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई केली जाणार असून, अशा जाहिरातींमध्ये सहभागी होणाऱ्या सेलिब्रिटींनाही जबाबदार धरले जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

पदभार स्वीकारताच धडाकेबाज कारवाई
तुकाराम मुंढे यांनी 25 मे रोजी अन्न व औषध प्रशासन आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला. गेल्या 21 वर्षांच्या प्रशासकीय सेवेत त्यांची ही 25 वी बदली ठरली आहे. भ्रष्टाचार आणि लाचखोरीच्या आरोपांमुळे चर्चेत असलेल्या विभागात मुंढे यांची नियुक्ती करण्यात आल्यानंतर आता कारवाईचा वेग वाढल्याचे दिसून येत आहे.
गुटखा, भेसळयुक्त अन्नपदार्थ, बेकायदेशीर व्यवसाय आणि भ्रामक जाहिरातींविरोधात सुरू केलेल्या मोहिमेमुळे तुकाराम मुंढे पुन्हा एकदा चर्चेत आले असून त्यांच्या कठोर भूमिकेचे सर्वसामान्य नागरिकांकडून स्वागत केले जात आहे.