सुनेत्रा पवारांसोबत 6 तास बैठक; प्रशांत किशोरांनी तटकरेंवरच बोट ठेवलं, प्रदेशाध्यक्षपदाबाबत मोठी मागणी?


मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या आगामी राजकीय रणनीतीबाबत महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. आगामी निवडणुकांसाठी राष्ट्रवादीसोबत काम करायचे असल्यास प्रदेशाध्यक्षपदाबाबत निर्णय घ्यावा लागेल, अशी भूमिका प्रशांत किशोर यांनी मांडल्याचे सांगितले जात आहे.

गुरुवारी मुंबईत सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांच्यासोबत प्रशांत किशोर यांची तब्बल सहा तास बैठक झाली. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनात्मक बांधणीसह आगामी निवडणुकांच्या रणनीतीवर चर्चा झाल्याची माहिती आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादीच्या महाराष्ट्रातील नेतृत्वाच्या कार्यपद्धतीवर थेट नाराजी व्यक्त केली. राज्यातील नेतृत्वासोबत समन्वय साधून काम होत नसेल, तर महाराष्ट्रात काम करणे कठीण असल्याचे त्यांनी सुनेत्रा पवार यांना सांगितल्याचे समजते.

यापूर्वीही सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी प्रशांत किशोर यांची तीन वेळा भेट घेतली होती. या भेटींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षसंघटनेत काही बदल करण्याच्या सूचना प्रशांत किशोर यांनी केल्याचे सांगितले जाते. मात्र, या सूचनांची अंमलबजावणी होत नसल्यास आगामी काळात काम करणे कठीण जाईल, अशी भूमिका त्यांनी घेतल्याची माहिती आहे.

‘भविष्यातील निवडणुकांसाठी माझ्याकडून काम करून घ्यायचे असेल, तर प्रदेशाध्यक्षपदाबाबत निर्णय घ्यावा लागेल,’ अशी ठाम भूमिका प्रशांत किशोर यांनी बैठकीत मांडल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि प्रशांत किशोर यांच्या टीममधील दोन सदस्य उपस्थित होते. जय पवार हे बैठकीत ऑनलाइन सहभागी झाल्याची माहिती आहे.

आता प्रशांत किशोर यांच्या भूमिकेनंतर सुनेत्रा पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाकडून काय निर्णय घेतला जातो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!