सर्वसामान्यांना धडकी भरणार! LPG सिलिंडर महागणार; पेट्रोल-डिझेलच्या दरातही सलग दुसऱ्या दिवशी…


मुंबई : काल आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी घसरण झाली. मात्र, त्याचा परिणाम देशांतर्गत पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ दरांवर अद्याप झालेला नाही. सरकारी तेल विपणन कंपन्यांनी आज (6 ऑगस्ट) जाहीर केलेल्या दरांनुसार, देशातील बहुतांश शहरांमध्ये इंधनाचे दर काल (5 ऑगस्ट) प्रमाणेच कायम आहेत.

व्हॅट आणि स्थानिक करांमुळे प्रत्येक राज्यात पेट्रोल-डिझेलचे दर वेगवेगळे आहेत. प्रमुख शहरांतील आजचे दर पुढीलप्रमाणे आहेत:

मुंबई – पेट्रोल ₹111.21 प्रति लिटर, डिझेल ₹97.83 प्रति लिटर
दिल्ली – पेट्रोल ₹102.20 प्रति लिटर, डिझेल ₹95.20 प्रति लिटर
कोलकाता – पेट्रोल ₹113.51 प्रति लिटर, डिझेल ₹99.82 प्रति लिटर

भारतामधील पेट्रोल आणि डिझेलच्या किमती या आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या दरांवर, डॉलरच्या तुलनेतील रुपयाच्या मूल्यातील चढ-उतार, मालवाहतूक खर्च, केंद्र सरकारचे उत्पादन शुल्क आणि राज्य सरकारच्या व्हॅटवर अवलंबून असतात. त्यामुळे प्रत्येक राज्य आणि शहरात इंधनाचे दर वेगवेगळे असतात.

गेल्या काही दिवसांत जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये चढ-उतार होत असला, तरी देशांतर्गत पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारात मोठे बदल झाले किंवा सरकारने करांमध्ये फेरबदल केला, तर येत्या काळात इंधनाच्या दरांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.

भारत आपल्या कच्च्या तेलाच्या गरजेपैकी 85 टक्क्यांहून अधिक तेल आयात करतो. त्यामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती दीर्घकाळ वाढल्या, तर आयात खर्च वाढून महागाईवरही परिणाम होऊ शकतो.

दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार, केंद्र सरकार एलपीजी आणि नैसर्गिक वायूवर नवीन कर लागू करण्याच्या प्रस्तावावर विचार करत आहे. प्रस्तावानुसार, एलपीजीवर प्रति किलो ₹1.29 कर लावल्यास घरगुती गॅस सिलेंडरची किंमत सुमारे ₹18 ने वाढू शकते. तसेच नैसर्गिक वायूवर प्रति मानक घनमीटर ₹1.43 कर लावण्याचाही प्रस्ताव असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!