महागाईचा भयंकर भडका! घरगुती LPG सिलिंडर तब्बल 29 रुपयांनी महागला; आजपासून नवे दर लागू, पाहा तुमच्या शहरातील किंमत

पुणे : पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांमुळे आधीच त्रस्त असलेल्या सर्वसामान्यांना आता महागाईचा आणखी एक मोठा झटका बसला आहे. तेल विपणन कंपन्यांनी घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला असून, नवे दर आजपासून (७ जून २०२६) देशभरात लागू झाले आहेत.

गेल्या तीन महिन्यांत घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ होण्याची ही दुसरी वेळ आहे. त्यामुळे गृहिणींच्या मासिक बजेटवर अतिरिक्त ताण निर्माण झाला आहे. मध्य पूर्वेतील वाढता तणाव आणि होर्मुझ सामुद्रधुनी परिसरातील वाहतूक अडचणींमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाच्या किमती वाढल्या आहेत. त्याचा परिणाम म्हणून एलपीजी सिलिंडरच्या दरात तब्बल २९ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
तुमच्या शहरात सिलिंडरचे नवे दर किती?
दरवाढीनंतर १४.२ किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरसाठी आता नवी दिल्लीत ९१३ रुपयांऐवजी ९४२ रुपये मोजावे लागणार आहेत. तर मुंबईत सिलिंडरचा दर ९१२.५० रुपयांवरून वाढून ९४१.५० रुपयांवर पोहोचला आहे.

तीन महिन्यांत दुसऱ्यांदा दरवाढ
यापूर्वी ७ मार्च रोजी तेल कंपन्यांनी घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात ६० रुपयांची वाढ केली होती. जागतिक बाजारात कच्चे तेल आणि ऊर्जा स्रोतांच्या किमती सातत्याने वाढत असल्याने तेल कंपन्यांवर आर्थिक दबाव वाढला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या ताज्या दरवाढीपूर्वी कंपन्यांना प्रत्येक सिलिंडरमागे सुमारे ७०३ रुपयांचा तोटा सहन करावा लागत होता. सरकारने संपूर्ण भार ग्राहकांवर टाकलेला नसला तरी या निर्णयामुळे सामान्य नागरिकांवरील आर्थिक ताण वाढणार आहे.

पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीच्या दरातही वाढ
महागाईचा फटका केवळ एलपीजीपुरता मर्यादित राहिलेला नाही. मे महिन्याच्या मध्यापासून आतापर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर एकूण ७.५० रुपयांची वाढ झाली आहे. तसेच वाहनांसाठी वापरल्या जाणाऱ्या सीएनजीच्या दरातही प्रतिकिलो सुमारे ६ रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे.
दरम्यान, कंपन्यांना सध्या पेट्रोलवर प्रतिलिटर सुमारे ११ रुपये आणि डिझेलवर ३३.६० रुपयांचा तोटा होत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आगामी काळात इंधनाच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.