घरात एकटीच होती विवाहित महिला; जुना परिचित अचानक घरात घुसला अन्…, पुढे जे घडलं त्याने नाशिक हादरलं

नाशिक : नाशिकच्या मखमलाबाद रोडवरील जाधव कॉलनी परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जुन्या ओळखीचा गैरफायदा घेत एका तरुणाने विवाहितेच्या घरात घुसून तिच्यावर जबरदस्तीचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. या मानसिक धक्क्यातून संबंधित महिलेने फिनाईल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.

या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात संशयित जय गणेश कोठुळे (वय २८, रा. दत्तनगर, पेठरोड, पंचवटी) याच्याविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला काही वर्षांपूर्वी संशयिताच्या कार्यालयात काम करत होती. त्या ओळखीचा गैरफायदा घेत आरोपीने तिच्या घरात प्रवेश केला. मंगळवारी दुपारच्या सुमारास महिला घरी एकटी असताना आरोपी घरात घुसला.

घरात प्रवेश करताच त्याने स्वयंपाकघरातील चाकू हातात घेत महिलेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. तसेच तिच्या मुलांना जीवे मारण्याची धमकी देत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.

आरोपीने महिलेला दोन दिवसांचा अवधी देत धमकी दिल्यानंतर तो घटनास्थळावरून पसार झाला. या घटनेमुळे महिला प्रचंड घाबरली होती. मानसिक तणावातून तिने घरातील फिनाईल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.
घटनेनंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. रुग्णालयात दिलेल्या फिर्यादीवरून पंचवटी पोलिसांनी संशयिताविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.