ओमराजेंना मोठी लॉटरी? श्रीकांत शिंदेंसह केंद्रात मंत्रिपदाची चर्चा; समोर आली मोठी अपडेट..


मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना पुन्हा एकदा वेग आला असून, महाराष्ट्रातील काही खासदारांना मंत्रिपदाची संधी मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या चर्चेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत नुकतेच दाखल झालेले खासदार ओमराजे निंबाळकर आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नावांची जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र, या दोन्ही नेत्यांनी मंत्रिपदाच्या चर्चांवर प्रतिक्रिया देत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

छत्रपती संभाजीनगर येथे माध्यमांशी संवाद साधताना डॉ. श्रीकांत शिंदे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपद आणि ओमराजे निंबाळकर यांना राज्यमंत्रीपद मिळणार असल्याच्या चर्चेबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, “या सगळ्या चर्चा तुम्हीच करता. आमचं संपूर्ण लक्ष पक्ष संघटना मजबूत करण्यावर आहे.

ते पुढे म्हणाले की, अलीकडेच मराठवाड्याचा दौरा पूर्ण केला असून, लवकरच विदर्भाचा दौरा करणार आहोत. आतापर्यंत 62 विधानसभा मतदारसंघांचा दौरा झाला आहे. आगामी काळात शिवसेना अधिक ताकदवान करण्यासाठी आम्ही काम करत राहणार आहोत.

दरम्यान, खासदार ओमराजे निंबाळकर यांनीही मंत्रिपदाच्या चर्चांना फारसं महत्त्व नसल्याचं स्पष्ट केलं. ते म्हणाले, मंत्री होणं ही माझी प्राथमिकता नाही. सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवणं आणि माझ्या मतदारसंघाचा विकास करणं हेच माझं ध्येय आहे.

ओमराजे पुढे म्हणाले, धाराशिव जिल्हा हा राज्यातील मागास जिल्ह्यांपैकी एक आहे. त्या जिल्ह्याचा विकास, रोजगाराच्या संधी आणि नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी सत्तेच्या बाजूने आलो आहे. पदापेक्षा लोकांची कामं करणं मला अधिक महत्त्वाचं वाटतं.

ते म्हणाले, मी रोज सामान्य नागरिकांच्या संपर्कात असतो. त्यांच्या समस्या मोठ्या आहेत आणि त्या सोडवणं हीच लोकप्रतिनिधी म्हणून माझी खरी जबाबदारी आहे. सत्तेची साथ मिळाल्याने आता ही कामं अधिक प्रभावीपणे करता येतील. माझ्यावर होणाऱ्या टीकेलाही मी कामातूनच उत्तर देईन.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!