सुनील तटकरे यांच्याच बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीला खिंडार! आदिती तटकरे यांच्या मतदारसंघात मोठी उलथापालथ; ‘तो’ नेता शिंदेंच्या गोटात जाणार?


रायगड : राष्ट्रवादी काँग्रेसमधील विलिनीकरणाच्या चर्चांना वेग आला असतानाच रायगडच्या राजकारणातून पक्षाला धक्का देणारी बातमी समोर आली आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा प्रभाव असलेल्या श्रीवर्धन मतदारसंघात राष्ट्रवादीच्या एका माजी तालुकाध्यक्षाने पक्षाची साथ सोडण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. दर्शन विचारे हे शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असून, शनिवारी पालकमंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे मंत्री आदिती तटकरे यांच्या मतदारसंघात राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दर्शन विचारे यांच्या निर्णयाने राजकीय वर्तुळात चर्चा

दर्शन विचारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिंदे सेनेत जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या पक्षप्रवेशाच्या निमित्ताने श्रीवर्धनमध्ये शिवसेना शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, पक्ष सोडण्याच्या निर्णयासोबतच विचारे यांनी सुनील तटकरे यांच्यावर टीका केल्याने या घडामोडीची चर्चा अधिक रंगली आहे. तटकरे यांच्या प्रभावक्षेत्रातच राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याने वेगळी वाट निवडल्याने पक्षासाठी हा राजकीय धक्का मानला जात आहे.

पालकमंत्रीपदापासून सुरू झालेला संघर्ष अजूनही कायम?

रायगडमध्ये राष्ट्रवादी आणि शिंदे यांच्या शिवसेनेतील मतभेद काही नवीन नाहीत. महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर पालकमंत्रीपदावरून भरत गोगावले आणि सुनील तटकरे यांच्यातील गटांमध्ये संघर्ष उफाळला होता. हा वाद मिटवण्यासाठी वरिष्ठ नेत्यांनी अनेकदा प्रयत्न केले. अखेर पालकमंत्रीपदाचा तिढा सुटला; मात्र दोन्ही पक्षांमधील कुरघोड्या सुरूच राहिल्या.

दरम्यान, तटकरे यांचे पुत्र अनिकेत तटकरे यांना विधान परिषदेवर पाठवण्याच्या वेळी दोन्ही पक्षांनी परस्पर सहकार्य केले होते. तरीही आरोप-प्रत्यारोपांचे सत्र थांबले नाही. शिवसेना नेते रामदास कदम यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या संदर्भात सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर आमदार महेंद्र थोरवे यांनीही तटकरे यांना लक्ष्य केले. भरत गोगावले यांनीदेखील राष्ट्रवादीविरोधात भूमिका मांडल्याने रायगडमधील महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा चर्चेत आले.

तटकरे यांच्यावरील आरोपांवर गोगावले काय म्हणाले?

सुनील तटकरे यांच्याबाबत रामदास कदम यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना गोगावले यांनी त्यांना पूर्वी तटकरे यांची उमेदवारी जाहीर केल्याची आठवण करून दिली. कदम हे ज्येष्ठ नेते असल्याने आपण अधिक खोलात जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले. वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असण्याची शक्यता व्यक्त करत त्यांनी युतीचा धर्म सर्वांनी पाळावा, अशी भूमिका मांडली. शिंदे यांनी दिलेल्या सूचनांनुसार आपण काम करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

अजित पवारांच्या विमान अपघाताबाबतही वक्तव्य

अजित पवार यांच्या विमान अपघातावर बोलताना गोगावले यांनी तपासातून सत्य समोर येईपर्यंत निष्कर्ष काढता येणार नसल्याचे सांगितले. वैमानिक स्वतःचा जीव धोक्यात घालून दुसऱ्याचा जीव घेईल का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. अपघाताच्या आदल्या दिवशी झालेल्या बैठकीबाबत चर्चा होत असल्याचा उल्लेखही त्यांनी केला; मात्र वस्तुस्थिती समोर येण्याची प्रतीक्षा करण्याची भूमिका घेतली.

ठाकरे-शिंदे एकत्र येण्याच्या चर्चेवर मिश्किल उत्तर

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे पुन्हा एकत्र येणार का, या चर्चेवरही गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली. राजकारणात काहीही घडू शकते, असे सांगत त्यांनी गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्याचा संदर्भ दिला. आगामी मंत्रिमंडळ बैठकीत पाटील यांना याबाबत विचारणार असल्याचेही त्यांनी म्हटले.

एकीकडे दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाबाबत चर्चा सुरू आहे, तर दुसरीकडे सुनील तटकरे यांच्या प्रभावक्षेत्रातच पक्षातील नेत्याने शिंदे सेनेची वाट धरल्याची घडामोड समोर आली आहे. दर्शन विचारे यांच्या प्रवेशामुळे श्रीवर्धनमध्ये शिवसेनेची ताकद वाढणार का? तसेच या पक्षांतराचे राष्ट्रवादीच्या स्थानिक संघटनेवर काय परिणाम होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!