पुणे-पिंपरीकरांना मोठा झटका! रिक्षा भाड्यात मोठी वाढ; आता किमान किती भाडे मोजावे लागणार?


पुणे : पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यात रिक्षाने प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने (RTA) रिक्षा भाडेवाढीला मंजुरी दिली असून, १ सप्टेंबरपासून नवीन दर लागू होणार आहेत. यानुसार, पहिल्या दीड किलोमीटरसाठी किमान भाडे २५ रुपयांवरून ३० रुपये, तर त्यानंतरचा प्रति किलोमीटर दर १७ रुपयांवरून २० रुपये करण्यात आला आहे.

वाढते इंधनदर, महागाई, सीएनजीच्या किमती, वाहनांची देखभाल, विमा आणि सुट्या भागांच्या वाढलेल्या खर्चाचा विचार करून हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे रिक्षाचालकांना काहीसा दिलासा मिळणार असला, तरी रोज रिक्षाने प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या खर्चात वाढ होणार आहे.

सोमवारी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या RTA बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीत परिवहन क्षेत्राशी संबंधित विविध विषयांवरही चर्चा झाली. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये सार्वजनिक वाहतुकीत रिक्षांचा मोठा वाटा असून, जिल्ह्यात सुमारे दीड लाख रिक्षा कार्यरत आहेत. त्यामुळे या निर्णयाचा परिणाम लाखो प्रवाशांवर होणार आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्षा संघटनांकडून भाडेवाढीची मागणी करण्यात येत होती. सध्याच्या भाड्यात व्यवसाय करणे परवडत नसल्याचे संघटनांचे म्हणणे होते. त्यानंतर आरटीएने नव्या भाडेदरांना मंजुरी दिली.

दरम्यान, नवीन भाडेदर लागू होण्यापूर्वी सर्व रिक्षाचालकांना मीटरचे रिकॅलिब्रेशन करून घेणे बंधनकारक असणार आहे. मीटरमध्ये आवश्यक बदल झाल्यानंतरच सुधारित भाडे आकारता येणार आहे.

या निर्णयामुळे नोकरदार, विद्यार्थी आणि दैनंदिन रिक्षा प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या खिशावर अतिरिक्त भार पडणार आहे. तर दुसरीकडे, वाढत्या खर्चामुळे अडचणीत आलेल्या रिक्षाचालकांसाठी हा निर्णय दिलासादायक ठरणार असल्याचे रिक्षा संघटनांनी म्हटले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!