पैशांसाठी बीडमध्ये मुकादमाचा मजूर महिलेवर अत्याचार, गावात अश्लील फोटोही केले व्हायरल, नराधमाचे संतापजनक कृत्य…

बीड : महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
बीडमध्ये एका मुकादमाने मजूर महिलेवर विकृतीचा कळस गाठला आहे. आरोपीनं पीडित महिलेवर अत्याचार करून तिचे फोटो गावातील व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हायरल केले आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही धक्कादायक घटना बीड जिल्ह्याच्या माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथे घडली आहे. ऊसतोडणीसाठी घेतलेल्या उचल रकमेतील बाकी देत नाही, म्हणून एका मुकादमाने एका विवाहित मजूर महिलेवर अत्याचार केला आहे.
तसेच नराधम आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने अत्याचार करतानाचे पीडित विवाहितेचे विवस्त्र अवस्थेतील फोटो शूट केले आणि हे फोटो गावातील व्हॉट्सॲप ग्रुपवर व्हायरल केले.
दरम्यान, गावात बदनामी झाल्याच्या कारणातून पीडित महिलेनं विष प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून आता दिंद्रुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अमोल शिंगारे असं आरोपी मुकादमाचं नाव आहे. शिंगारे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर तो फरार झाला आहे.
या धक्कादायक प्रकाराची पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून आरोपीच्या अटकेसाठी पथकं रवाना करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. पैशांसाठी एका उसतोड मजूर विवाहित महिलेवर अशाप्रकारे मुकादमाने अत्याचार केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.