आनंदाचा प्रवास क्षणात दुःखात बदलला; बोरघाटात मिनी बस उलटून ८ जण जखमी


पुणे : घराकडे परतणाऱ्या प्रवाशांचा आनंदाचा प्रवास काही क्षणांत भीषण अपघातात बदलला. प्रवाशांच्या किंकाळ्या, मदतीसाठी सुरू झालेला आरडाओरडा आणि रस्त्यावर उलटलेली मिनी बस… बोरघाटातील हा थरारक अपघात पाहून अनेकांच्या अंगावर काटा आला. जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील मंकी हिल परिसरात बुधवारी दुपारी मिनी बस उलटून आठ जण जखमी झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, खंडाळा घाट उतरताना अमृतांजन ब्रिजच्या वरच्या बाजूस, एचओसी ब्रिज परिसरात हा अपघात घडला. मंकी हिल येथील बॅटरी पॉईंटजवळ बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने मिनी बस अचानक पलटी झाली. अपघातानंतर काही प्रवासी बसमध्ये अडकले होते, तर काही जण जखमी अवस्थेत मदतीसाठी ओरडत होते.

घटनेची माहिती मिळताच आयआरबीची टीम, खाजगी ॲम्बुलन्स आणि मदतकार्य करणाऱ्या स्वयंसेवकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने जखमींना बाहेर काढून खोपोली नगरपरिषद रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातातील सहा ते सात जण किरकोळ जखमी असल्याची माहिती समोर आली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, जखमी सर्व प्रवासी मुरबाड तालुक्यातील शेळके पाडा परिसरातील रहिवासी आहेत. अपघात नेमका कशामुळे झाला, याचा तपास खोपोली पोलीस करत आहेत. या घटनेमुळे काही काळ महामार्गावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!