उच्चशिक्षित तरुण अन् पुणे महापालिकेत मोठ्या नोकरीचं स्वप्न; 15 लाख दिले, पण सत्य समजताच सरकली पायाखालची जमीन, पोलिसात धाव

पुणे : पुणे महानगरपालिकेत कनिष्ठ अभियंता, वरिष्ठ अभियंता तसेच थेट ‘उपायुक्त’ पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एका तरुणाची तब्बल १५ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपीने बनावट नियुक्तीपत्रे, बदलीचे आदेश आणि ओळखपत्र तयार करून तरुणाचा विश्वास संपादन केला. या प्रकरणी पर्वती पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
शिवानंद बाळासाहेब पाटील (वय ४५, रा. कर्वेनगर, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. धायरी येथील ३५ वर्षीय तरुणाने याप्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शिवानंद पाटील याने आपण ‘क्रीडा अधीक्षक’ म्हणून कार्यरत असल्याचे सांगितले होते. तसेच मंत्रालयातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांशी आपले चांगले संबंध असल्याचे सांगून तरुणाचा विश्वास संपादन केला.


बनावट नियुक्तीपत्रे देत १५ लाखांची फसवणूक
डिसेंबर २०२३ ते १२ ऑगस्ट २०२६ या कालावधीत आरोपीने महापालिकेत मोठ्या पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून तक्रारदाराकडून टप्प्याटप्प्याने तब्बल १५ लाख रुपये घेतले. फसवणूक लक्षात येऊ नये म्हणून आरोपीने पुणे महापालिकेच्या बनावट सही आणि शिक्क्यांचा वापर करून नियुक्तीपत्र, बदलीचे आदेश तसेच बनावट ओळखपत्र तयार करून दिले.
मात्र, काही काळानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने थेट पोलिसांकडे धाव घेतली. त्यानंतर पर्वती पोलिसांनी तपास करून आरोपीला अटक केली.
आरोपीविरोधात यापूर्वीही गुन्हे
अटक करण्यात आलेला शिवानंद पाटील हा सराईत भामटा असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. यापूर्वीही नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी त्याच्याविरोधात शिवाजीनगर आणि भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात दोन गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पर्वती पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक (गुन्हे) कविता हिवरकर करत आहेत.